esakal | पिंपरणे परिसरात बिबट्याची दहशत 
sakal

बोलून बातमी शोधा

Panic of leopards in Pimparne area

गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यातील पिंपरणे येथील ठोंबरे वस्ती परिसरात बिबट्याची मादी व दोन पिलांचे भर दिवसा दर्शन घडते. त्यांच्या अस्तित्वामुळे प्रवासी व शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत आहे.

पिंपरणे परिसरात बिबट्याची दहशत 

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यातील पिंपरणे येथील ठोंबरे वस्ती परिसरात बिबट्याची मादी व दोन पिलांचे भर दिवसा दर्शन घडते. त्यांच्या अस्तित्वामुळे प्रवासी व शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत आहे. 

संगमनेर तालुक्‍यात उसाचे क्षेत्र, पिण्यासाठी पाणी व लपण या आदर्श अधिवासामुळे तालुक्‍यातील प्रवरा नदीकाठच्या पट्ट्यात बिबट्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मानवाच्या त्यांच्या अधिवासातील वावराला सरावलेले बिबटे शक्‍यतो त्यांच्यापासून फटकूनच राहतात. मात्र, कधीकाळी मानवाच्या हस्तक्षेपामुळे दुखावलेले किंवा मानवी समूहाची भीती नष्ट झालेले बिबटे दुचाकीच्या मागे पळताना आढळतात. 

पिंपरणे शिवारातून जाणाऱ्या संगमनेर ते शिबलापूर रस्त्यावरही काही दिवसांपासून दोन पिलांसह एका मादी-बिबट्याचे भरदिवसा दर्शन होत आहे. पिल्लांना इजा करतील या भीतीने ती वाहनांचा पाठलाग करून त्यांना घाबरवीत धुमाकूळ घालीत आहे. बुधवारी (ता. सात) सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून घराकडे परतणाऱ्या विशाल ठोंबरे याच्या दुचाकीवर केलेल्या हल्ल्यात तो जखमी झाला. त्याच्या ओरडण्यामुळे त्याचा भाऊ, वडील व चुलत्यांनी धाव घेतल्याने, बिबट्याने पिलांसह पळ काढला. या परिसरात मादी-बिबट्याच्या केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून, शेळ्या- मेंढ्यांचेही नुकसान केले आहे. 

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी बापूसाहेब देशमुख, सरपंच अजित देशमुख, राजेंद्र देशमुख, सुभाष ठोंबरे, मंजाबापू साळवे, चंद्रकांत ठोंबरे, पोपट जाधव, प्रल्हाद ठोंबरे, राहुल निकम यांनी केली आहे. या परिसराची पाहणी आज वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शेखर पाटोळे, अरविंद यादव, सुखदेव राहिंज आदींनी करून, पिंजरा लावला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image