कर्जतमध्ये वाहतुक कोंडीकडे पोलिसांचे लक्ष; लक्ष्मण रेषेत शिस्तबद्ध पार्किंग

निलेश दिवटे
Monday, 28 December 2020

पहले बात, फिर मुलाकात, जरूरत पडे तो लाथ हा ‘तिरंगा’मधील डायलॉग सर्वांनाच परिचित असेल.

कर्जत (अहमदनगर) : पहले बात, फिर मुलाकात, जरूरत पडे तो लाथ हा ‘तिरंगा’मधील डायलॉग सर्वांनाच परिचित असेल. त्याचीच प्रचिती सध्या कर्जत आणि राशीनमध्ये येत आहे.

एरव्ही बेशिस्त लावण्यात आलेली वाहने, वाहतुकीची कोंडी हे चित्र बदलून येथील कर्जत- राशीन, कर्जत- मिरजगाव मुख्य रस्त्यालगत आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेत वाहने शिस्तबद्ध पार्किंग केलेली आहेत. आठ दिवसात कर्जत येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही किमया साधली. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काम करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर काहीही होऊ शकते, याचा अनुभव सध्या कर्जतकर घेत आहेत. शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्त लावलेली वाहने आणि वाहतूक कोंडीला नागरिक कंटाळले होते.

मात्र, पोलीस निरीक्षक यादव यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या सहकार्याने शहरातील राशीन, मिरजगाव या अत्यंत वर्दळीच्या मुख्य रस्त्यालगत पार्किंगसाठी लक्ष्मण रेषा आखून दिली आणि अप्रत्यक्षपणे कर्जतकर दोरीत रहा असा इशारा दिला. परिणामी वाहन चालक, व्यापारी व सर्वसामान्य जनतेला शिस्त लागली. यामुळे पूर्वी वाहतुकीसाठी कमी पडणारा रस्ता आता मोठा दिसु लागला आहे. या कारवाईची धास्ती वाहन धारकांनी घेतली आहे. मात्र, या धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर कॉमन मॅन मात्र खुश असल्याचे चित्र आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parking due to traffic police in Karjat