अहमदनगर : शिर्डीत वाहनतळांची वानवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shirdi International Airport

नाताळच्या सुटीत यंदाही भाविकांचे होणार हाल; परंपरा कायम राहणार

अहमदनगर : शिर्डीत वाहनतळांची वानवा

शिर्डी : वाहतूक आणि वाहनतळ यांचा आणि साईबाबांच्या शिर्डीचा पहिल्यापासून छत्तीसचा आकडा आहे. पोलिसांची वाहतूक शाखा दंडात्मक आकारणी करीत इष्टांकपूर्तीत मग्न असते. नगरपंचायत आणि साईसंस्थान वाहनतळ उभारणीकडे डोळेझाक करते. त्यात भाविक भरडले जातात. गर्दीच्या काळात वाहतुकीचा बोजवारा उडतो. सध्याचे नियोजन पाहता, वाहतुकीचा बोऱ्या आणि भाविकांचे हाल ही वर्षानुवर्षांची परंपरा यंदाही कायम राहणार आहे.

साईसंस्थान साईनगरच्या जागेचा वाहनतळ म्हणून वापर करते. त्या जागेची निगा राखली जात नाही, सुरक्षारक्षकांच्या मनाला वाटेल तसे वेडेवाकडे बॅरिकेड लावायचे, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा पार करीत वाहन मागे नेईपर्यंत धुरळा उडतो. त्यात उभ्या असलेल्या वाहनांवर धुळीची पुटे चढतात. वाहनतळ कसे नसावे, याचे हे एक उत्तम उदाहरण.बसस्थानकाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरची साईसंस्थानची धर्मशाळा आणि खाली छोटेसे वाहनतळ आहे. तेथे नजरेत भरतील असे फलक लावण्याचा आणि वाहनतळाचा उपयोग करण्याचा विसर संस्थान प्रशासनास पडला आहे. स्वच्छता राहत नाही म्हणून वाहनतळाचा दरवाजा चक्क बंद असतो.

नगरपंचायत आता नगरपरिषद व्हायला निघाली आहे. अडचण एवढीच, की सुटीच्या काळात लाखांची गर्दी होणाऱ्या या शहरात नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अद्यापही बहुमजली वाहनतळ उभारावे असे कधी वाटले नाही. वाहनतळासाठी जागा आरक्षित, मात्र उभारणी अजेंड्यावरदेखील नाही, हे शहराचे मोठे दुर्दैव.वाहने उभी करायला जागा नाही, रस्त्यावर ती उभी केली की वाहतूक शाखा दंड आकारते. आराम बसगाड्या रस्त्यावर कशाही आणि कुठेही उभ्या राहतात. ते पाहून एखाद्याने आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावले की दंड ठरलेला. गर्दीच्या काळात भाविकांची ही परवड आणि वाहतुकीचा बोऱ्या, ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. ती यंदाही कायम राहणार आहे.