Ahmednagar : पारनेरला हक्काचे पाणी मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagr

Ahmednagar : पारनेरला हक्काचे पाणी मिळणार

पारनेर : कित्येक वर्षांपासून पुणेकरांनी पळविलेले हक्काचे कुकडीचे पाणी आपणास मिळत नाही. ते पाणी येत्या सहा महिन्यांत जलसंपदाच्या माध्यमातून व निकषात ठरविल्याप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मिळवून देणार असल्याची ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

डॉ. विखे आज पारनेर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन विकासकामांची उद्‌घाटने केली. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, विकास रोहकले, वसंत चेडे, राहुल शिंदे, सचिन वराळ, दिनेश बाबर, सोनाली सालके, शिवाजी सालके, सुनील थोरात, दत्ता पवार, सागर मैड, मनोज मुंगशे, सोन्याबापू भापकर, डॉ. भाऊसाहेब खिलारी, किरण कोकाटे, गोरख पठारे, संपत सालके, सरपंच योगश रोकडे उपस्थित होते.

जवळा येथील कृषिगंगा पाणीवापर संस्थेच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, की कुकडी कालव्याच्या चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मी माझे मशिन मोफत देतो. शेतकऱ्यांनी त्यात इंधन टाकून सर्व चाऱ्या उन्हाळी आवर्तन सुटण्यापूर्वी साफ करून घ्याव्यात, असे आवाहन केले.

जिल्ह्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने एक महिन्यात आपण त्यांच्या मान्यतेनुसार एक पायलेट प्रोजेक्ट जिल्ह्यात राबविणार आहोत. या माध्यमातून जिल्ह्यात जेवढे ओढे, नाले तसेच शिवरस्ते आहेत त्यांची पुढच्या तीनमध्ये मोजणी केली जाईल. त्यांच्या हद्दी निश्चित करून खुणा केल्या जातील. यासाठी शेतकऱ्यांना खर्च करायची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून सहा महिन्यांमध्ये एकही जमिनीचा मोजणीचा अर्ज शिल्लक ठेवणार नाही. त्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज भासणार नाही. असेही ते म्हणाले.

नवनाथ सालके, संपत सालके व दिलीप मदगे यांची पाणीवापर संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. म्हसे खुर्द येथील जलजीवन योजनेच्या कामाचे उद्घाटन, तसेच पाणी वाटप योजना, दिनेश बाबर यांच्या हॉटेल मुरली, विश्वनाथ कोरडे यांच्या सेतू कार्यालयाचे उद्‌घाटन डॉ. विखे यांच्या हस्ते झाले.

सुपे येथे लवकरच दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करू. खरेदी-विक्रीसाठी आठ-आठ दिवस नंबर लागत नाहीत. त्यासाठी महसूलमंत्र्यांच्या परवानगीने सुपे येथे एक महिन्याच्या आत नवीन रजिस्ट्रेशन ऑफिस सुरू करत आहोत.