esakal | पारनेर तालुका पाच दिवसांसाठी लॉकडाउन

बोलून बातमी शोधा

लॉकडाउन

पारनेर तालुका पाच दिवसांसाठी लॉकडाउन

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, तसेच वाढणारा कोरोनारुग्णांचा मृत्यूदर विचारात घेता, तालुक्‍यात पाच दिवसांसाठी कडक "लॉकडाउन'चा आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी (ता. 28 ) दिला आहे. आता पुढील पाच दिवसांसाठी हॉस्पिटल व औषध दुकाने वगळता इतर सर्व सेवा व आस्थापना बंद राहतील.

तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन व नागरिकांना वेळोवेळी सूचना देऊनही त्या सूचनांचे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन होत नसल्याने तहसीलदार देवरे यांनी हा निर्णय घेतला आहे. (ता. 28) पारनेर शहरासह सुपे व भाळवणीत भाजीबाजार भरला होता. तेथे अनावश्‍यक गर्दी होत असल्याचे निर्दशनास आल्याने, तहसीलदार व पोलिस यंत्रणेने संबंधितांवर कारवाई केली.

अनेक वेळा सूचना देऊनही त्यांचे पालन होत नसल्याने, अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार देवरे यांनी दिले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूचे प्रमाण पाहता, पारनेर तालुक्‍यात पाच दिवसांसाठी हा निर्णय घेतला आहे. अत्यंत आवश्‍यक, म्हणजे औषध दुकाने आणि दवाखाने, तसेच रुग्णांची वाहतूक सुरू आहे. शहरासह तालुका पाच दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यू होणारांचे प्रमाणही वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे. या पाच दिवसांमध्ये कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरल्यास कठोर कारवाई केली जाईल.

- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर