पाथर्डी : मोहटादेवी गडावर ‘आईराजा उदो’चा गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagare

पाथर्डी : मोहटादेवी गडावर ‘आईराजा उदो’चा गजर

पाथर्डी : ‘आईराजा उदो उदो,’ ‘मोहटादेवी की जय’, अशा जयघोषात, हजारो भाविकांच्या उपस्थितीत, मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आज (सोमवारी) मोहटादेवी गडावर देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी व नीता गोसावी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेच्या मुहूर्ताला उपस्थित राहाता यावे म्हणून काल (ता. २५) मध्यरात्रीपासूनच गडावर भाविकांची रीघ लागली होती. देवीगडाकडे जाणारे सर्व रस्ते आज वाहनांनी व पायी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.

आज सकाळी मोहटे गावातून महाआरती करून देवीच्या तांदळ्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी रेणुका विद्यालयाचे लेझीम व टिपरीपथक होते. मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाल्या होत्या. मिरवणूक गडावर पोचल्यानंतर देवीच्या मूर्तीला सुवर्णालंकार घालण्यात येऊन, घटस्थापनेच्या विधीला प्रारंभ करण्यात आला. पौरोहित्य नारायण सुलाखे, भूषण साखरे यांनी केले.

या वेळी दिवाणी न्यायाधीश अश्विनी बिराजदार, विश्वस्त डॉ. ज्ञानेश्वर दराडे, भीमराव पालवे, आजिनाथ आव्हाड,अशोक भगवान दहिफळे, अशोक विक्रम दहिफळे, विजयकुमार वेलदे, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. आज गडाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

याशिवाय आज शहरातील गाडगे आमराई, कालिकामाता मंदिर, तिळवण तेली समाज मंदिर, चौंडेश्वरी, आराध्यांची देवी, तसेच तालुक्यातील धामणगाव, कोरडगाव, तिसगाव, येळी, खरवंडी कासार या ठिकाणीसुद्धा मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली.