महाविकास आघाडीसाठी शरद पवार यांनी टाकले फासे, बुधवारी मुंबईत होणार दुसरा धमाका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

शहरातील खासगी रुग्णालयाच्या उद्‌घाटनासाठी पवार आले होते. आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

नगर : नगर जिल्हा बँकेबाबत भाजपने रणनीती आखली आहे. कोणत्याही स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही बँक आपल्याकडेे खेचून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले आहे. काल झालेल्या दौऱ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फासे टाकले आहेत.

महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना त्यांनी कानमंत्र दिला आहे. या बाबत येत्या बुधवारी (ता. 27) मुंबईत बैठक घेणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. या बैठकीतच दुसरा धमाका केला जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या रणनीतीला खिंडार पाडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ मार्गदर्शन करतील. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी बैठकीस यावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे. 

हेही वाचा - अण्णांचे शेतकऱ्यांसाठी करेंगे या मरेंगे

शहरातील खासगी रुग्णालयाच्या उद्‌घाटनासाठी पवार आले होते. आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नरेंद्र घुले, राहुल जगताप, पांडुरंग अभंग आदी उपस्थित होते. चंद्रशेखर घुले यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत माहिती दिली. 

जगताप कुटुंबीयांतर्फे आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप यांनी पवार यांचा सत्कार केला. पार्वती जगताप, जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा जगताप, नगरसेविका शीतल जगताप, विलास जगताप, डॉ. शशिकांत फाटके, डॉ. वंदना फाटके, वैभव जगताप, विकी जगताप आदी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pawar's strategy for Ahmednagar District Bank elections