
वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. वर्षभरात इंधनाच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने लॉकडाऊनंतर मालवाहतुकीत सरासरी 30 टक्के भाडेवाढ झाल्याचे जय माकिजा यांनी सांगितले.
श्रीरामपूर ः कोरोनाच्या संकटातून सावरताना सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करण्याची वेळ निर्माण झाली आहे. दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलसह खाद्यतेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये पेट्रोलसह डिझेलच्या दरात सलग चार ते पाच रुपयांनी वाढ झाल्याने पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली.
शहरात पॉवर-पेट्रोल 94 रुपये सहा पैसे आणि साधे-पेट्रोल 90 रुपये 64 तर डिझेल 79 रुपये 60 पैसे असा दर होते. तसेच मागील दहा दिवसांमध्ये खाद्यतेलाचे दर सरासरी पाच रुपयांनी वाढले आहेत.
हेही वाचा - कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांना अजूनही पगार मिळेना
आणखी दरवाढीची शक्यता मुकेश न्याती यांनी वर्तवली. लॉकडाऊनमुळे प्रदेश, व्यापार आणि व्यवहार विस्कळीत झाल्याने तेलाची आयात प्रक्रीया ठप्प झाली. तसेच स्थानिक खाद्यतेल उत्पादन मंदावले आणि खप वाढल्याने खाद्यतेलाचे दरही झपाट्याने वाढले.
दिवाळीनंतर गॅस सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली. बदलत्या जीवनशैलीमुळे पेट्रोल-डिझेलसह खाद्यतेल आणि गॅस सिलेंडर सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजा बनल्या आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरीकांवरील आर्थिक ताण अधिक वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागु केलेल्या लाकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. परिणामी, आर्थिक अडचणीवर मात करताना महागाईचा भडका सातत्याने वाढत आहे.
वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. वर्षभरात इंधनाच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने लॉकडाऊनंतर मालवाहतुकीत सरासरी 30 टक्के भाडेवाढ झाल्याचे जय माकिजा यांनी सांगितले.
घरगुती गॅस सिलेंडरसह खाद्यतेलाचे दर कडाडल्याने आर्थिक भार सहन करण्याची वेळ निर्माण झाल्याचे गृहिणी राधिका क्षिरसागर यांनी सांगितले. सण-उत्सव समारंभ आणि विविध सोहळ्यासाठी खाद्यतेलाची मोठी मागणी असते. सध्या तेलाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने विविध खाद्यपदार्थांच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरीकांवर महागड्या दरात इंधन खरेदी करण्याची वेळ ओढावली आहे.
जादा पैसे देऊन सिलेंडर घेण्याची वेळ
घरगुती वापरातील गॅस सिलेंडरसाठी केंद्र-सरकारकडुन मिळणारी सबसिडी सात महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे आज 703 रुपये 50 पैसे जमा करुन गॅस सिलेंडर खरेदी करावा लागत आहे. नोव्हेंबरमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात दोन टप्यात 50 रुपये अधिक 50 रुपये अशी सलग दरवाढ झाली. त्यामुळे 603 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर 703 रुपये देवून खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली.
संपादन - अशोक निंबाळकर