नेवाशात होणार शुभ मंगल...लग्नाळूंची स्वप्नपूर्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

मंत्री शंकरराव गडाख यांनी याबाबत जिल्हाधिकारी, नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी, नेवासे तहसीलदार यांच्याशी चर्चा करून नियमावलीनुसार लग्न समारंभास मंगल कार्यालय वापरण्यास परवानगी देणे याबाबत सूचित केले होते.

नेवासे : नेवासा तालुक्यात शुभ मंगल सावधान अशा मंगलाष्टकांचा आवाज गुंजणार आहे. जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याने लग्नाळूंची स्वप्नपूर्ती होणार आहे. तालुक्यातील मंगल कार्यालयधारकांना मंगल कार्यालये सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे, अशी माहिती मंगल कार्यालय मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

नेवासे तालुक्यातील मंगल कार्यालय धारकांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांची भेट घेऊन सोशल डिस्टन्स पाळून तसेच कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपयोजना करण्याच्या नियमाना अधीन राहून 50 लोकांमध्ये लग्न समारंभ करण्यास मंगल कार्यालय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.

हेही वाचा - जिल्हा परिषद माजी अध्यक्ष-उपाध्यक्षांना जुगारवाल्यांचा पुळका

मंत्री शंकरराव गडाख यांनी याबाबत जिल्हाधिकारी, नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी, नेवासे तहसीलदार यांच्याशी चर्चा करून नियमावलीनुसार लग्न समारंभास मंगल कार्यालय वापरण्यास परवानगी देणे याबाबत सूचित केले होते.

त्यानुसार उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शुक्रवार (ता. 22) मे रोजी नेवासे तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय मालकांची एकत्रित बैठक घेऊन सर्व नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर नेवासा तालुक्यातील मंगल कार्यालयधारकाना परवानगी दिली.

या निर्णयामुळे नेवासे तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय धारकांचा व या मंगल कार्यालयवर रोजंदारी अवलंबून असणाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मंगल कार्यालयधारक व त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व लोकांनी नामदार शंकरराव गडाख यांना धन्यवाद दिले आहेत.

"मंत्री शंकरराव गडाख यांनी मंगल कार्यालय मालक संघटनेच्या मागणीचा विचार करून व तो प्रत्यक्षात आणून मंगल कार्यालयावर अवलंबून असलेल्या शेकडो जणांच्या रोजीरोटीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला. सर्व मंगल कार्यालय चालक प्रशासनाच्या सर्व अटी-शर्तीचे पालन करू. 
-अमोल अभंग, संचालक, साईश्रद्धा मंगल कार्यालय, कुकाणे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission for marriage in Nevasa