सरकारने रॉकेल बंद केले... डिझेल, पेट्रोलही मिळेना

शांताराम काळे
Wednesday, 22 July 2020

अकोले तालुक्याच्या ग्रामीण आदिवासी भागातील सुशिक्षित बेरोजगार टपरीधारक व नुसत्या या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या तरुणांना जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीचे समुळ उच्चाटन होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात डिझेल व पेट्रोल विक्रीचा अधिकृत परवाना द्यावा.

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्याच्या ग्रामीण आदिवासी भागातील सुशिक्षित बेरोजगार टपरीधारक व नुसत्या या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या तरुणांना जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीचे समुळ उच्चाटन होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात डिझेल व पेट्रोल विक्रीचा अधिकृत परवाना द्यावा, यामध्ये सरकारने कायमस्वरूपी रॉकेल बंद केल्याने ज्या व्यावसायिकांचे 2023 पर्यंत नुतनीकरण झाले आहेत, अशा परवाना धारकांना डिझेल, पेट्रोल विक्रीचे परवाने द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भंडारदरा धरण व परीसर प्रती काश्मीर सद्य स्थितीत पर्यटकांना बंदी आहे.  त्यामुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्यामुळे येथील मध्यम व छोट्या व्यावसायिकांना आपला प्रपंच चालविणे ही मुश्किली झाले आहे. सदर आदिवासी ग्रामीण भाग अहमदनगर जिल्हाचे शेवटचे टोक आहे. राजुर 20 किलोमीटर तर घोटी (इगतपुरी) 36 किलोमीटर कुठेही डिझेल, पेट्रोल पंप सुविधा नाही. परीसरातील 30 ते 40 खेडेगावात 100ते 150 चारचाकी तर किमान 500 दुचाकी आहेत. यांना अर्धा लिटर डिझेल, पेट्रोलसाठी दुर जाणे परवडणारे नाही. ही बाब अत्यावश्यक असल्याने परीसरातील वाहनचालकांची कोंडी होत आहे.

त्यामुळे परीसरात काही व्यावसायिक अनाधिकृतपणे सदर व्यवसाय करुन उपजिविका चालवित होते. मात्र राजुर पोलिस स्टेशनने कायद्याचा बडगा दाखवुन परिसराचा परीपुर्ण विचार न करता हे व्यवसाय बंद केले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी तहसीलदारांमार्फत ज्यांना परवाने हवे आहेत. त्यांना सुरक्षेच्या हमीवर शासकीय फी आकारणी करुन तात्पुरत्या स्वरुपात परवाने द्यावेत, अशी मागणी ग्रामीण आदिवासी भागातुन केली जात आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील महिला बचत गट बालवाडीला पोषण आहार पुरवित होते. मात्र कोरोना महामारीमुळे पोषण आहार देण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे शेकडो महिला बचत गटांना काम नाही. ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्था पुर्णपणे खिळखिळी झाली. यातुन सावरण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची कार्यवाही करावी, अशी बचतगटांनी केली आहे. 

भंडारदरा परीसर ग्रीन झोन असल्याकारणाने डिझेल, पेट्रोल पंपांना परवानगी अशक्य आहे. सद्य परिस्थितीमध्ये प्रत्येक गावात थेट अकोल्यातील पंप मालकांच्या गाड्या डिझेल विक्री करत आहेत. मात्र पेट्रोलची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोल विक्री करण्यासाठी परवानगी द्यावी, असे निवेदन नितीन शहा, सुनील सरूकते, सरपंच परिषदेचे पांडुरंग खाडे, संपत झडे आदी 25 कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permit the sale of diesel and petrol to the unemployed in rural tribal areas in Akole taluka