शेवगाव- पांढरीपूल रस्त्याची चाळण; खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त कधी लागणार

राजू घुगरे 
Sunday, 20 December 2020

शेवगाव- पांढरीपूल रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.

अमरापूर (अहमदनगर) : शेवगाव- पांढरीपूल रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांनी जीवघेण्या अपघातांची मालिका सुरू असताना, ते बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त कधी लागेल, असा सवाल प्रवाशांमधून व्यक्‍त होत आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शेवगाव- मिरी- पांढरीपूल हा रस्ता नगर, राहुरी, शनिशिंगणापूर येथे जाण्यासाठी अत्यंत सोयीचा असल्याने, त्यावरून जड वाहने व प्रवासी वाहनांची कायम वर्दळ असते. सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरू असल्याने त्यावरून सोनई, प्रसाद, ज्ञानेश्वर, गंगामाई, वृद्धेश्‍वर कारखान्यांना जाणाऱ्या ट्रॅक्‍टर व ट्रकची ये-जा सुरू आहे. मात्र, हा रस्ता सध्या शेवगाव शहरापासूनच लहान-मोठ्या खड्ड्यांनी व्यापला आहे. त्यावरून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे.

पावसाळा संपून तीन-चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी बांधकाम विभागाला रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. शेवगाव तालुक्‍यातील अनेक भागांत खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी सांगत असले, तरी संथ गतीने सुरू असलेले काम व रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या पाहता, ते पुढील वर्षी पावसाळ्यापर्यंत तरी पूर्ण होतील का, याबद्दल प्रवाशांमध्ये साशंकता आहे. 

या रस्त्यावर वडुले बुद्रुक, सामनगाव, मळेगाव, आखतवाडे, आपेगाव, ढोरजळगाव, निंबेनांदूर या गावांनजीक सर्वांत जास्त खड्ड्यांचे साम्राज्य असून, वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ परिसरातील नागरिक व इतर वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits on the road from Shevgaon to Pandharipool