कोल्हार- घोटी राज्य मार्गावर संगमनेर तालुक्यात लहान मोठ्या खड्ड्यांनी चाळण

आनंद गायकवाड
Wednesday, 2 December 2020

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार- घोटी राज्य मार्गाची निमगावजाळी ते संगमनेर या 24 किलोमिटरमध्ये अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे.

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार- घोटी राज्य मार्गाची निमगावजाळी ते संगमनेर या 24 किलोमिटरमध्ये अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. लहान मोठ्या खड्ड्यांनी चाळण झालेला हा राज्यमार्ग अनेक ठिकाणी खचल्याने, कामाच्या दर्जाविषयी शंका निर्माण होत आहे.

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या महत्वाच्या मार्गापैकी राज्यमार्ग क्रमांक 44 हा कोल्हार घोटी आंतरराज्य मार्ग आहे. आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी, नगर, शनि शिंगणापूर, मनमाड, कोपरगाव, सोलापूर व अकोले मार्गे नाशिक जिल्ह्यातील घोटी आदी ठिकाणी जाण्यासाठी उपयुक्त असलेल्या या मार्गावर अवजड वाहनांसह दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते.

राज्यातील इतर जिल्ह्यांना जोडणारी सार्वजनिक वाहतूकही याच मार्गाने होत असल्याने, हा मार्ग प्रवाशांसाठी महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर पूर्वी वडगावपान शिवारात संगमनेर लोणी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत देखभाल व दुरुस्तीचे काम होत असे. त्या मोबदल्यात टोल वसूल करण्यात येई. मात्र टोलनाका बंद झाल्यानंतर या मार्गाची देखभाल दुरुस्ती अभावी मोठी दूरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण केले आहे. मात्र थोड्यात अवधीत त्यावर पडलेले असंख्य खड्डे, व काही ठिकाणी मार्ग खचल्याने निर्माण झालेले मोठे खड्डे वाहनचालकांची परीक्षा पाहत आहेत.

या मार्गावर मांची फाटा, कोंची गावठाण, कोंची ते निझर्णेश्वर दरम्यानचा घाटरस्ता, कोकणगाव शिवार, वडगावपान, वडगावपान फाटा पेट्रोलपंप, समनापूर ते थेट संगमनेर तीन बत्ती चौक या ठिकाणी असंख्य लहान मोठे खड्डे पडले असून, कोंची गावठाण, घाट आदी मोक्याच्या वळण व उतारावर पडलेले खड्डे व रस्ता खचल्याने धोकादायक झाला आहे.

नव्याने तयार केलेला रस्ता खचल्याने या कामाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाहतुकीची मोठी घनता असलेल्या या मार्गाची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits in Sangamner taluka on Kolhar Ghoti state highway