पारनेर सैनिक बँकेला फिर्यादीनेच गंडवले, बनावट शिक्के मारून दाखवला कर्जभरणा

मार्तंड बुचुडे
Friday, 16 October 2020

लिलाव प्रकरणात सहभाग नाही, त्यांनाही आरोपी केल्याने संबंधितांनी फिर्यादींच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संतोष भनगडे यांनी सांगितले.

पारनेर ः पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे गैरव्यवहार प्रकरण गेली अनेक दिवसांपासून गाजत आहे. नुकताच बँकेचे आजी-माजी अध्यक्षांसह तेरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

जमीन लिलाव प्रकरण व इतर चौकशीसाठी काही कार्यकर्ते व यातील फिर्यादी गुन्हे दाखल करावेत व चौकशीसाठी उपोषण केले होते. त्या नंतर मात्र गुन्हे दाखल झाल्यावर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. फिर्यादीनेच बँकेचे बनावट शिक्के तयार करून कर्ज खाती रक्कम भरली आहे, अशी फसवणूक केली आहे. 

लिलाव प्रकरणात सहभाग नाही, त्यांनाही आरोपी केल्याने संबंधितांनी फिर्यादींच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संतोष भनगडे यांनी सांगितले.

सैनिक बँकेने पुरूषोत्तम शहाणे याच्या कुटुंबियांची जमिनीचा लिलाव थकित कर्जाच्या वसुलीपोटी चुकीच्या पद्धतीने केला असल्याचा आरोप फिर्यादी शहाणे यांनी केला आहे. त्या विरोधात शहाणे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सौनिक बँकेच्या दोषी विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून उपोषणास बसले होते, त्या नुसार सैनिक बँकेच्या आजी-माजी अध्यक्षांसह तेरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

त्या नंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. यात बँकेचे अधिकारी भनगडे यांनी सांगितले की, लिलाव प्रकरणात फिर्याद दाखल केलेल्या शहाणे व त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट शिक्के तयार करून बँकेत कर्ज भरणा केल्याच्या बनावट पावत्या तयार करून बँकेची फसवणूक केली होती.

यावर बँकेने न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर शहाणे यांनी न्यायालयासमोर तडजोड करून कर्जाची रक्कम जमा केल्याचे कागदपत्रेही उपलब्ध झाली आहेत. न्यायालयासमोर तडजोड करून दावा मागे घेण्याची विनंती शहाणे यांनी केली होती. मात्र, त्यांनी पुन्हा बँकेने या प्रकरणात आपली फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.

सैनिक बँकेचे विशेष वसुली अधिकारी संतोष भनगडे ,भरत पाचारणे, दत्तात्रय भुजबळ हे कर्मचारी शहाणे यांच्या जमिनीच्या लिलाव प्रसंगी इतर शाखेत कार्यरत होते. त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसताना शहाणे यांनी त्यांची नावे फिर्यादीत टाकली आहेत. 

या बाबत भनगडे यांचा जमीन लिलाव प्रकरणात संबंध नसल्याची शहाणे यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र ज्यांचा संबध नाही अशा लोकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी शहाणे यांनी फिर्यादीत नाव टाकले आहे. त्यामुळे आपली बदनामी झाली व मनस्ताप झाल्याने शहाणे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे भनगडे यांनी सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The plaintiff defrauded Parner Sainik Bank