साई संस्थानच्या ड्रेसकोडबाबतच्या त्या फलकाला भूमाता ब्रिगेडने फासले काळे

सतीश वैजापूरकर
Thursday, 7 January 2021

तेथे तैनात असलेले सुरक्षारक्षक व पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर लगेच फलक पुसून स्वच्छ करण्यात आला. अवघ्या पाच-सात मिनिटांत हे नाट्य संपुष्टात आले.

शिर्डी ः साईदर्शनासाठी भाविकांनी सभ्य पोषाखात यावे, असा मजकूर असलेल्या साईसंस्थानच्या विनंती फलकावर आज भूमाता ब्रिगेडच्या समर्थकांनी काळा रंग फेकून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

तेथे तैनात असलेले सुरक्षारक्षक व पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर लगेच फलक पुसून स्वच्छ करण्यात आला. अवघ्या पाच-सात मिनिटांत हे नाट्य संपुष्टात आले. 

हेही वाचा - विधवा भावजयीसोबत लहान दिराने बांधली लग्नगाठ

साईसंस्थानने लावलेल्या फलकांवरील मजकूर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, अशी भूमिका घेत गेल्या 10 डिसेंबर रोजी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई येथील फलक हटविण्यासाठी शिर्डीला येत होत्या. मात्र, त्यांना नगर जिल्ह्याच्या सीमेवरच अडवून पोलिसांनी परत पुण्याला धाडले होते.

त्यावेळी त्यांनी येत्या 31 डिसेंबरपर्यंत फलक हटविले नाहीत, तर पुन्हा शिर्डीत येऊन फलक हटवू, असा इशारा दिला. ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांना विरोध करण्याची भूमिका घेतली होती. 

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास साईमंदिर परिसराच्या एक क्रमांकाच्या दरवाजाजवळ ही घटना घडली. या तिघांनी खाकी पाकीटातून काळे ऑईलसदृश्‍य पदार्थ एका फलकावर फेकला.

पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या माहितीनुसार, या तिघांनीही आपण भूमाता ब्रिगेडचे समर्थक असल्याचे सांगितले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे म्हणाले, की श्रद्धा व सबुरी ही साईबाबांची शिकवण आहे. फलकांवर काळा द्रव पदार्थ टाकण्याचा प्रयत्न झाला. संस्थान सुरक्षारक्षकांनी हे फलक लगेच स्वच्छ केले. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The plaque on Sai Sansthan's dress code was torn down by the Bhumata Brigade