esakal | श्रीगोंद्यात अपघातानेच वाळूतस्करांवर कारवाई

बोलून बातमी शोधा

वाळू चोरी

श्रीगोंद्यात अपघातानेच वाळूतस्करांवर कारवाई

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : म्हसे (ता. श्रीगोंदे) येथील घोड नदीपात्रात आठ दिवसांपासून बोटींच्या साहाय्याने वाळूचोरी सुरू होती. तक्रारी आल्या; मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही. शेवटी काल सकाळी वाळूची वाहतूक करणाऱ्या एका वाहनाखाली दुचाकी सापडून अपघात झाला. अपघाताचे छायाचित्र व्हायरल झाले. त्यामुळे नाइलाजाने तहसीलदार, बेलवंडी पोलिसांनी कारवाई केली.

म्हसे गावकऱ्यांनी वाळूचोरीला विरोध केला; मात्र त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने वाळूचोरीला मूकसंमती दिली. वाळूउपशाबाबत तक्रारी आल्या; मात्र तहसीलदार प्रदीपकुमार पवार, बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आज सकाळी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला वाहनाखाली घेतले.

यात दुचाकीस्वार जखमी झाला. हे सगळे चित्रण मोबाईलमध्ये झाले आणि लगेच व्हायरलही झाले. हे पाहून तहसीलदार आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी धावले. दरम्यान, अपघाताने का होईना; पण वाळूचोरांवर कारवाईची "नामुष्की' प्रशासनावर आली.

तहसीलदार पवार म्हणाले, ""सायंकाळपर्यंत आठ बोटी फोडल्या. पंधरा बोटी फोडून नुकसान करण्यात येईल. गुन्हा दाखल होणार नाही; कारण आम्हाला वाळूचोर कोण आहेत याबद्दल माहिती नाही. सकाळी झालेल्या अपघाताबद्दल कुणी तक्रार दिली, तर तो गुन्हा पोलिस दाखल करून घेतील.''

तक्रार करणाऱ्यांनाच केले लक्ष्य

म्हसे येथील वाळूचोरीची तक्रार तेथील काही समाजसेवकांनी केली होती. काल सकाळी त्या तक्रारदारांवर प्रशासनाने करडी नजर टाकत, गर्दी हटविण्याच्या नावाखाली त्यांना मारहाण केल्याची चर्चा आहे. त्यामुळे तेथे मोठा संताप असून, हे प्रकरण मंत्र्यांपर्यंत नेण्याचा इशारा काहींनी दिला. दरम्यान, तहसीलदार पवार यांनी हे नाकारले. गर्दी हटविण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले.