व्यापाऱ्यास लुटणाऱ्या चार आरोपींना पकडले; कोपरगाव तालुक्यात पोलिसांची कारवाई

सुर्यकांत वरकड
Tuesday, 22 December 2020

निवारा (ता. कोपरगाव) येथील व्यापाऱ्यास धारदार शस्त्राचा धाक दाखवून 4 लाख 98 हजार 900 रुपयांना लूटणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.

अहमदनगर : निवारा (ता. कोपरगाव) येथील व्यापाऱ्यास धारदार शस्त्राचा धाक दाखवून 4 लाख 98 हजार 900 रुपयांना लूटणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. सोमनाथ रघुनाथ गोपाळ, गणेश जालिंदर चव्हाण, राहुल प्रभाकर गोडगे व रवींद्र अर्जुन तुपे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 86 हजार 500 रुपये हस्तगत केले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याबाबत दिलीप शंकर गौड (वय 35, रा. निवारा, ता. कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, वाईन्स दुकानातून रोख रक्कम घेऊन घरी जाताना काही जणांनी गौड यांना अडविले. धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांना 4 लाख 98 हजार 900 रुपयांना लुटले होते. हा गुन्हा सोमनाथ गोपाळ (रा. वाघवस्ती, शिर्डी) याने साथीदारांसह केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथून सोमनाथ गोपाळ यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गणेश चव्हाण, राहुल गोडगे, रवींद्र तुपे, सिद्धार्थ तुपे, अनिल कांबळे व सागर तांदळे यांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध घेत, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. सिद्धार्थ तुपे, अनिल कांबळे व सागर तांदळे यांचा शोध सुरू आहे. 

चोरीस गेलेल्या रकमेपैकी 86 हजार 500 रुपये पोलिसांनी हस्तगत केले. आरोपींना मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. आरोपींविरुद्ध संगमनेर, जळगाव, पाचोरा आदी ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action in Kopargaon taluka