मिसिंग प्रकरणातील कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लाच स्वीकारताना पोलिस कर्मचारी जाळ्यात

आनंद गायकवाड
Sunday, 13 December 2020

लाच स्वीकारताना संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक बापूसाहेब देशमुख यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सायंकाळी पोलिस ठाण्यातच पकडले.

संगमनेर (अहमदनगर) : मिसिंग प्रकरणातील कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नातेवाइकांकडून एक हजाराची लाच स्वीकारताना संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक बापूसाहेब देशमुख यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सायंकाळी पोलिस ठाण्यातच पकडले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शहरातील घोडेकर मळा परिसरातील एक महिला काही दिवसांपासून मिसिंग असल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल होती. ती शुक्रवारी (ता. 11) सापडल्याने तिला घेऊन नातेवाईक आज शहर पोलिस ठाण्यात आले होते. हा तपास पोलिस नाईक बापूसाहेब देशमुख यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी काही कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी आणि ही मिसिंग निकाली काढण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली.

या प्रकाराबाबत तक्रारदारांनी नाशिकच्या लाचलुचपत पथकाकडे तक्रार केली होती. पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील व प्रशांत सपकाळे, पोलिस नाईक एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन व संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने सापळा लावून ही कारवाई केली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested while accepting bribe in Sangamner taluka