esakal | भाजीबाजार उठवल्याने पोलिसांनाच धक्काबुक्की

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज
भाजीबाजार उठवल्याने पोलिसांनाच धक्काबुक्की
sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः गर्दी झाल्याने शहरात भाजी व फळविक्रेत्यांना विक्री बंद करण्याचे आवाहन केल्याचा राग आल्याने, त्यांनी पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांच्यासह दोन पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याचा धक्कादायक प्रकार परवा (ता. 28) घडला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी होते की नाही, हे पाण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे व पोलिस निरीक्षक बळप आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील लाल चौकात गेले. तेथे भाजीविक्रेत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे त्यांना ध्वनिक्षेपकाद्वारे तेथून जाण्यास सांगण्यात आले.

या आवाहनानंतर बहुतेक विक्रेते निघून गेले. मात्र, सुभाष कुलट, सचिन कुलट यांनी तहसीलदार देवरे व पोलिस निरीक्षक बळप यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. भाजी विकल्याशिवाय येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली, तसेच पोलिसांना शिवीगाळ करण्यासही सुरवात केली. त्यानंतर बळप यांना धक्काबुक्की केली. त्यात त्यांची नेम प्लेट तुटली. पोलिस कर्मचारी सत्यजित शिंदे व गहिनीनाथ यादव तेथे आले असता, त्यांनाही धक्काबुक्की केली.

याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात हवालदार शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष कुलट, सचिन कुलट व बाबाजी खोडदे (सर्व रा. जामगाव रस्ता, ता. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.