कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्याला पोलिसांनी पकडले

सुनील गर्जे 
Tuesday, 1 December 2020

सलाबतपूर येथे कमरेला गावठी पिस्तूल लावून आरोपी काळे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस पथकाने सलाबतपूर शिवारातील दिघी चौकाजवळील नजन वस्तीजवळ सापळा रचून विलास काळे याला पकडले.

नेवासे (अहमदनगर) : कमरेला पिस्तूल लावून फिरताना नेवासे तालुक्यातील सलाबतपूर शिवारातील वस्तीवर नेवासे पोलिसांनी एकास पकडले. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल व 11 जिवंत काडतुसे जप्त केली. याबाबत नेवासे पोलिसांनी बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विलास श्रीपत काळे (वय 65, रा. सलाबतपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर त्याचा मुलगा आरोपी पाल्या विलास काळे हा पसार झाला.

हे ही वाचा : केसापूर शिवारात आढळले बिबट्याचे बछडे
 
सलाबतपूर येथे कमरेला गावठी पिस्तूल लावून आरोपी काळे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस पथकाने सलाबतपूर शिवारातील दिघी चौकाजवळील नजन वस्तीजवळ सापळा रचून विलास काळे याला पकडले. त्याची झडती घेतली असता, कमरेला एक व पॅन्टच्या खिशात एक, अशी प्रत्येकी 40 हजार रुपये किंमतीची दोन गावठी पिस्तूले व साडेपाच हजार रुपये किंमतीचे 11 जिवंत काडतुसे, असे 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल सापडला. चौकशीत काळे यांनी हे पिस्तूल त्याचा मुलगा पाल्या काळे याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have nabbed a man with a pistol in his waist at Salabatpur