पोलिस निरीक्षक विकास वाघ यांचा जामीन अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी आरोपी वाघ यांच्यातर्फे अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली. गुन्ह्यातील आरोपी कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी होते.

नगर : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी निलंबित पोलिस निरीक्षक विकास वाघ यांचा अटकपूर्व जामीनअर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. 

कोतवाली पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी 2019मध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत ओळख वाढविली. तिच्या मोबाईलवर सतत संपर्क केला. नंतर घरी जाऊन पिस्तूलाचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तिने प्रतिकार केला असता, पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर तिला सरकारी बंगल्यात नेऊन बलात्कार केला. त्यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली असता, वाघ यांनी तिला गर्भपातास भाग पाडले.

हा सर्व प्रकार असह्य झाल्याने पीडितेने एप्रिलमध्ये पोलिस अधीक्षकांकडे वाघ यांची तक्रार केली. त्यानंतरही आरोपीने पीडित तरुणीस बोलावून घेतले. एमआयडीसी परिसरात फुटकी बाटली तिच्या गळ्याला लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ती पैसे मागत असल्याचे रेकॉर्डिंग केले, असे पीडितेने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी आरोपी वाघ यांच्यातर्फे अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली. गुन्ह्यातील आरोपी कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी होते. आरोपीने गुन्ह्यात पिस्तूल, पट्‌टा, मद्याची बाटली, गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करणे बाकी आहे. आरोपीचे कपडे, मोबाईल जप्त करणे बाकी असून, त्याची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असल्याने आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर करावा, असा युक्तिवाद सहायक सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी केला.

आरोपीतर्फे अटकपूर्व जामिनासाठी युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ग्राह्यधरून जिल्हा न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासादरम्यान 307 वाढीव कलम लावण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Inspector Vikas Wagh's bail application was rejected