वर्षभरापूर्वी आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला एक लाखाची लाच घेताना पकडले

Police subinspector arrested for taking bribe in Sangamner taluka
Police subinspector arrested for taking bribe in Sangamner taluka

संगमनेर (अहमदनगर) : काही दिवसांपासून जिल्हा पोलिस विभाग विविध कारणास्तव रडारवर येत आहे, त्यात संगमनेरातही भर पडली. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अवघ्या एक वर्षापूर्वी बदलून आलेले पोलिस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंग परदेशी (वय 32) व खासगी व्यक्ती विशाल रविंद्र पावसे (वय 3, रा. साईश्रध्दा चौक, संगमनेर) यांना काल दुपारी 12 च्या सुमारास नाशिक येथील सोनाराकडून अटक न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. 

यावेळी परदेशी त्यांनी पोलिस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र क्रीडा संकुलाजवळ त्यांना पकडण्यात आले. या घटनेने संगमनेर पोलिसांची जाहिर बेअब्रु झाली आहे. या घटनेनंतर शहरातील कट्ट्यांवर परदेशी यांच्या अवैध व्यावसायिकांशी असलेल्या अर्थपूर्ण घनिष्ट संबंधांची खमंग चर्चा सुरु होती. त्यांची यापूर्वीच वसई पोलिस ठाण्यात बदली झाली आहे, मात्र त्यांनी अद्याप येथील पदभार सोडला नव्हता. याबाबत अधिक माहिती अशी, मालदाड रोड परिसरातील स्वतःच्या घरातून त्यांच्या दिवट्याने मित्राच्या मदतीने सुमारे सव्वातीन लाख रुपयांची चोरी केली होती. यातील दागिने त्याने वडील आजारी असून, पैशांची गरज असल्याचे सांगत नाशिक येथील सोनाराला विकले होते. अवघ्या चार दिवसांपूर्वी यातील आरोपींना राणा परदेशी यांनी गोव्यातून अटक केली होती.

या प्रकरणातील चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाला गुन्ह्यात अटक न करण्यासाठी परदेशी यांनी त्या सोनाराकडे 31 ऑक्टोबर 2020 रोजी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये आज देण्याचे ठरले होते. मात्र खमक्या सोनाराने थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, उपाधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शहर पोलिस ठाण्याजवळ सापळा रचला होता.

पंचासमक्ष लाचेची रक्कम खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या पथकात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विजय जाधव, पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस नाईक प्रकाश डोंगरे, वैभव देशमुख, प्रणय इंगळे, हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com