
चिखलठाण येथे अवैध वाळू वाहतुकीसाठी लाच मागितल्याप्रकरणी व्हिडीओ पुराव्यासह ग्रामस्थांच्या तक्रारीवरून, पोलिस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण बाबासाहेब केकान यांना निलंबित करण्यात आले.
राहुरी (अहमदनगर) : चिखलठाण येथे अवैध वाळू वाहतुकीसाठी लाच मागितल्याप्रकरणी व्हिडीओ पुराव्यासह ग्रामस्थांच्या तक्रारीवरून, पोलिस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण बाबासाहेब केकान यांना निलंबित करण्यात आले. निलंबन कालावधीत त्यांची नगर येथे पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारला.
चिखलठाण येथे १२ ऑक्टोबरला घराच्या कामासाठी मुळा नदीपात्रातून वाळू भरून चाललेला टेम्पो पोलिस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण केकान यांनी पकडला. याप्रकरणी टेम्पो मालक भारत नानाभाऊ काळनर यांच्याकडे अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता मागितला. पैसे दिले नाहीत. तर, साहेबांनी गाडी लावायला सांगितली आहे. अशी वरिष्ठांच्या नावाने लाच मागितली. पोलीस खात्याची बदनामी केली. याप्रकरणी १५ मिनिटांच्या व्हिडिओ पुराव्यासह ग्रामस्थ भारत काळनर व जमीर सय्यद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज केले.
पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी तक्रारीची प्राथमिक चौकशी केली. त्यात, व्हिडीओ पुराव्यातील संभाषण व साक्षीदारांचे जबाब नोंदवून त्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला. त्यावर, ११ नोव्हेंबरला निलंबनाचा आदेश काढण्यात आला. त्यात "व्हिडीओ क्लिपमध्ये अवैध वाळू वाहतूकीच्या हप्त्याची मागणी करतांना दिसत आहे.
केकान यांनी बेजबाबदार वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली आहे. चौकशीत हस्तक्षेप व साक्षीदारांवर दबाव टाकण्याची संधी प्राप्त होऊ नये. म्हणून त्यांना पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे."
"केकान यांनी जिल्हा मुख्यालयात प्रत्येक शुक्रवारी परेड ग्राउंडवर उपस्थित राहून हजेरी द्यावी. पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही." असेही आदेशात म्हंटले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा अकरा नोव्हेंबर रोजीचा पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण केकान यांच्या निलंबनाचा आदेश राहुरी पोलीस ठाण्यात प्राप्त झाला. तेंव्हापासून केकान गैरहजर होते. त्यांना बोलावून बुधवारी (ता. २५) रोजी आदेश बजावला आहे. त्यांच्या गैरहजेरीचा अहवाल आज मुख्यालयात पाठविला आहे.
- हनुमंत गाडे, पोलीस निरीक्षक, राहुरी
संपादन : अशोक मुरुमकर