वाळू चोरीसाठी निवडला असा मार्ग... पोलिसांची चौघांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

सोशल मीडियातून संगमनेर शहरातील नागरी वस्तीतून बेकायदा वाळू वाहतुक करणाऱ्या जुनाट रिक्षांबाबत गदारोळ झाला.

संगमनेर (अहमदनगर) : सोशल मीडियातून संगमनेर शहरातील नागरी वस्तीतून बेकायदा वाळू वाहतुक करणाऱ्या जुनाट रिक्षांबाबत गदारोळ झाला. त्यामुळे संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने प्रवरा नदीवरील गंगामाई घाट परिसरातील मंदिराजवळ चार रिक्षा जप्त केल्या.
संगमनेरातील गंगामाई घाट हा निसर्गरम्य परिसर सकाळ सायंकाळी पायी फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरीक व इतरांच्या आवडीचे ठिकाण आहे. या ठिकाणी असलेल्या मंदिरांमुळे या परिसराचे पावित्र्य वाढले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा परिसर वाळू तस्करांमुळे चर्चेत आला आहे.
प्रशासनाच्या नाकावर टिच्चून या परिसरातून रात्रंदिवस प्रवरा पात्रातून वाळू उपसा सुरु असतो. त्यात कोविडमुळे प्रशासननाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने, वाळू चोरांचे चांगलेच फावले आहे. या परिसरातील रस्त्यांवर बेफाम वेगाने चालणाऱ्या भंगारमधील कालबाह्य रिक्षांची धास्ती नागरिकांची घेतल्याच्या अनेक पोस्ट समाज माध्यमांवर छायाचित्रांसह झळकल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आज संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने या भागात कारवाई करुन, प्रवासी वाहतुकीसाठी पूर्वी वापरल्या जाणाऱ्या चार जुनाट रिक्षा त्यातील प्रत्येकी अर्धा ब्रास वाळूसह ताब्यात घेतल्या.
या प्रकरणी चार पोलिस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या स्वतंत्र फिर्यादीवरुन भाऊनाथ राजू आव्हाड, रा. संगमनेर खुर्द याच्या ताब्यातील रिक्षा ( एमएच. 17 ई. 80 ), भागवत बर्डे, रा. कासारवाडी, ता. संगमनेर याच्या ताब्यातील रिक्षा ( एमएच. 15 बी. 2305 ), भारत सर्जेराव पवार ( वय 17 ) रा. कतार गल्ली, संगमनेर याच्या ताब्यातील रिक्षा ( एमएच. 15 जे. 103 ) व शिवाजी शरद काळण ( वय 37 ), रा. लाल तारा कॉलनी, अकोले नाका, संगमनेर याच्या ताब्यातील विना क्रमांकाची रिक्षा अशी सुमारे दोन लाख रुपयांची वाहने व आठ हजार रुपये किंमतीची दोन ब्रास वाळू जप्त केली आहे.

संगमनेर शहर पोलिस ठाण्यात या चार आरोपींविरोधात विनापरवाना बेकायदेशीररीत्या सरकारी मालकीचे गौण खनिज चोरी करीत असताना मिळून आल्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police take action against four persons for stealing sand from a rickshaw in Sangamner taluka