पोलिस पथकाने लॉकडाऊनचे उल्लंघन करणा-यांविरोधात केली कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ralegan Siddhi

काही नागरिक निष्काळजीपणाने वागतात, त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस दलाने कडक भुमिका घेत दंड आकारणी सुरू केली आहे.

पोलिस पथकाने लॉकडाऊनचे उल्लंघन करणा-यांविरोधात केली कारवाई

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : कोरोनाच्या दुस-या लाटेत रूग्ण संख्या वाढल्याने राज्य शासनाने कठोर निर्बंध लावत लॉकडाऊन जाहीर केले आहे. पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व त्यांच्या पथकाने राळेगणसिद्धी येथे हजेरी लावत लॉकडाऊनचे उल्लंघन करणा-या दोघांविरोधात कारवाई करत दीड हजार रूपयांचा दंड वसूल केला.

पारनेर - शिरूर रस्त्यावर राळेगणसिद्धीच्या मुख्य चौकात पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व त्यांच्या सहका-यांनी विनाकारण फिरणा-या व विनामास्क लोकांच्या विरोधात ही मोहिम राबवली. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी राज्यशासनाने 'ब्रेक द चैन' ही मोहिम राबवताना कठोर निर्बंध लादले असून कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. तरीही काही नागरिक निष्काळजीपणाने वागतात, त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस दलाने कडक भुमिका घेत दंड आकारणी सुरू केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, तसेच अत्यावश्यक सेवांमधील अधिकारी कर्मचा-यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे.

हेही वाचा: होम क्‍वॉरंटाईन व्हावे लागल्याने महसुलमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यशासनाची ही भुमिका आहे. तरीही काही नागरिक शासनाचे नियम पाळत नसतील तर पोलिसांना कठोर कारवाईचे अधिकार शासनाने दिले आहेत. त्यानुसार संचारबंदीचे उल्लंघन केल्यास एक हजार रूपये दंड तर विना मास्क फिरणा-यांना 500 रूपये तर अकरा वाजल्यानंतर दुकाने सुरू राहिली तर दहा हजार रुपये दंड आकारून ही कारवाई केली जाते. त्यानुसार राळेगणसिद्धीत ही कारवाई केली. पारनेर तालुक्यातील सर्व नागरिकांनी राज्य शासनाचे नियम पाळावेत तसेच जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, त्यांनी विलगीकरण कक्षात रहावे, असे आवाहन पोलिस निरिक्षक घनश्याम बळप यांनी केले आहे.

नागरिकांनी आपले कर्तव्य समजून विनाकारण बाहेर पडून गर्दी करू नये. आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला पाहिजे. सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्रच चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी वेळोवेळी हात धुणे, मास्क लावणे, महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडल्यावर सामाजिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे आहे.

- घनश्याम बळप, पोलिस निरिक्षक, पारनेर

Web Title: Police Team Has Taken Action Against Those Who Violated The Lockdown By Attending Ralegan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagar
go to top