नगरची ठिणगी विझली, मात्र भिवंडीत पेटली!

प्रकाश पाटील
Sunday, 27 December 2020

पारनेरनंतर (जि. नगर) भिवंडीत नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत आहेत.

अहमदनगर : पारनेरनंतर (जि. नगर) भिवंडीत नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत आहेत. खरे तर आघाडी सरकार (विरोधकांच्या म्हणण्यानुसार रिक्‍शा सरकार) चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. कारण किमानसमान कार्यक्रमावर तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. 

पारनेर नगर पंचायत समितीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आघाडीत पहिली ठिणगी नगरमध्ये पडली होती. त्यानंतर भिवंडीत पडली... आता भिवंडीत कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते नाराज आहेत. राष्ट्रवादी आमच्या नगरसेवकांना घेतेच कसे? असा सवालही काही नेते करीत आहेत. अकोले तालुक्‍यात राष्ट्रवादीच्या एका नेत्याला कॉंग्रेसमध्ये घेतले. म्हणजेच आघाडी धर्माचा विचार केला तर कोणीच कोणाविरोधात शिंतोडे उठविण्याचे मुळात कारणच नाही. 

पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी थयथयाट केला होता. आमचे नगरसेवक आम्हाला परत द्या, अशी थेट मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांनीही केली होती. पुढे पाच नगरसेवकांची घरवापसी झाली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यावाठी येथे क्लिक करा
अकोलेत राष्ट्रवादीचा नेता फोडल्यानंतर या पक्षाच्या नेत्यांनी आकंड तांडव केला नाही. पारनेरबाबत शिवसेनेने थयथयाट केला. उद्या राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसचा नेता जर शिवसेनेत गेला तर ते त्यांना प्रवेश देणार नाहीत का ? स्थानिक पातळीचे राजकारण विविध रंगाने भरलेले असते. त्याला संदर्भही वेगळे असतात. हे मुळात लक्षात घेणे गरजेचे आहे. 

पारनेरमध्ये शिवसेनेने मागितले म्हणून पाच नगरसेवक परत दिले. तसेच प्रत्येक वेळी होईलच असे म्हणता येणार नाही. भिंवडीत अठरा नगरसेवक फुटतात. ते का नाराज आहेत याचा विचार कॉंग्रेसच्या नेतृत्वाने करायला हवा. तसाच तो शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही करायला हवा. राज्यात फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादीला मोठी गळती लागली होती. म्हणून या पक्षाचे नेते हतबल झाले नाहीत. उलट राष्ट्रवादीने दुसरी फळी तयार केली. त्यामुळे विधानसभेत काय झाले हे सर्वश्रूत आहे. 

मुद्दाम फोडाफोडी केली तर समजू शकतो. पण, स्वत:हून जर कोणी एखाद्या पक्षात जात असेल तर त्यांना कसे रोखता येईल. ता. क. कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे, की आमच्यात कोणतेही मदभेद नाहीत. तसे असेल तर स्वागतच आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Political story between Congress NCP and Shivsena