वळण ग्रामपंचायतीत तनपुरे-कर्डिले गटांत लागले राजकीय वळण

विलास कुलकर्णी
Saturday, 9 January 2021

आमच्या काळात तत्कालीन आमदार कर्डिले यांच्या मदतीने भरीव विकासकामे केली. सत्ताधाऱ्यांनी मात्र सांगण्यासारखी कामे केली नाहीत. 

राहुरी : वळण ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फोल ठरले. सत्ताधारी जनसेवा मंडळाच्या झेंड्याखाली राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे कार्यकर्ते एकत्र आहेत.

विरोधात परिवर्तन मंडळाच्या झेंड्याखाली तरुणांचे व उमेदवारी डावलल्याने नाराजांचे मंडळ उभे ठाकले आहे. त्यांना माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांची साथ लाभली आहे. 

वळण येथे जनसेवा मंडळाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे बाळासाहेब खुळे, राहुरी बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय खुळे, ज्ञानेश्वर खुळे, बी. आर. खुळे, अशोक कुलट, बाळासाहेब शिंदे करीत आहेत. परिवर्तन मंडळाचे नेतृत्व बाबा खुळे, कारभारी खुळे, विजय मकासरे, रमण खुळे करीत आहेत. 

हेही वाचा - तब्बल सहा बिबट्यांचा आजीबाईंवर हल्ला

प्रचाराचा प्रारंभाच्या नारळ वाढविण्याप्रसंगी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढल्याने निवडणुकीत रंग भरला आहे. त्यात, प्रभाग चारमधील संतप्त महिलांनी नळाला आलेले दूषित पाणी घेऊन विरोधी उमेदवारांसमोर व्यथा मांडल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यामुळे चर्चेला कारण मिळाले. राजकारण आणखी तापले. 

"परिवर्तन'च्या प्रचाराचा नारळ वाढविण्याच्या वेळी माजी उपसरपंच बाबा खुळे म्हणाले, की मागील पाच वर्षांत फक्त सरपंच- उपसरपंचपदे वाटून घेतली. सत्ताधारी सत्तेसाठी हपापले आहेत. पाच वर्षांत किती ग्रामसभा घेतल्या, किती ठराव मंजूर केले, मंजूर ठरावांची अंमलबजावणी किती केली, किती आश्वासने पूर्ण केली, याचा हिशोब जनतेसमोर द्यावा.

आमच्या काळात तत्कालीन आमदार कर्डिले यांच्या मदतीने भरीव विकासकामे केली. सत्ताधाऱ्यांनी मात्र सांगण्यासारखी कामे केली नाहीत. 

"जनसेवा'च्या प्रचाराचा नारळ वाढविण्याच्या प्रसंगी दत्तात्रेय खुळे म्हणाले, की आम्ही सत्तेला चिटकून बसणारे नाही. सर्वांना समान संधी दिली. पाच वर्षांत विविध विकासकामे केली. विद्युत रोहित्रे, रस्त्यांची कामे मार्गी लावली. दिलेली आश्वासने पाच वर्षांत पूर्ण केली. विरोधक मतदारांची दिशाभूल करीत आहेत. त्यांना मतदार थारा देणार नाहीत. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political struggles broke out in Tanpure-Kardile groups in Walan Gram Panchayat