सांगा कोतकर नक्की कोणाचे? भाजप-राष्ट्रवादीकडून दावा, शिवसेना म्हणते, फसणूक झाली

अमित आवारी
Saturday, 26 September 2020

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीनंतर राष्ट्रवादी- शिवसेनेमध्ये खेळीमेळीचे वातावरण होते; परंतु शिवसेनेच्या अधिकृत पेजवर या निवडीविषयी काहीशी नाराजी होती.

नगर ः महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीला अवकाश असला, तरी राजकारण चांगलेच तापू लागले आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी मास्टर स्ट्रोक खेळत भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांना राष्ट्रवादीत आणले. त्यांना स्थायी समितीचे सभापतिपद दिले. मात्र, आता प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. यात राष्ट्रवादी व भाजप दोन्ही पक्ष "मनोज कोतकर आमचेच,' असे म्हणत आहेत. यात शिवसेनेची मात्र गोची झाली आहे. 

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीनंतर राष्ट्रवादी- शिवसेनेमध्ये खेळीमेळीचे वातावरण होते; परंतु शिवसेनेच्या अधिकृत पेजवर या निवडीविषयी काहीशी नाराजी होती. यातच भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र गंधे व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी, मनोज कोतकर अजूनही भाजपचेच नगरसेवक असल्याचे सांगितल्याने, शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणतात, की मनोज कोतकर यांनी अधिकृतरीत्या पक्षप्रवेश केला आहे. यामुळे मनोज कोतकर नेमके कोणाचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी- भाजपमध्ये सभापतिपदाची खेचाखेची होत असताना मनोज कोतकर "नॉट रिचेबल' असल्याचे समजते. 

भाजपचा कोणताच नगरसेवक फुटण्यासारखा नाही. आमदार काय बोलले, हे मला माहीत नाही; परंतु मनोज कोतकर यांचा विषय प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घातला आहे. 
- महेंद्र गंधे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप 

 
राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या विकासकामांमुळे कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा पक्षप्रवेशासाठी आग्रह आहे. भाजपमधील नगरसेवकही संपर्कात आहेत. भविष्यात त्यांचाही राष्ट्रवादीत प्रवेश होईल. 
- संग्राम जगताप, आमदार, नगर 

महाविकास आघाडीची फसवणूक केली आहे का? महाविकास आघाडीच्या निर्णयावर झालेल्या सभापतींनी आपले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत सदस्यपत्र जाहीर करावे. महाविकास आघाडी ज्येष्ठ नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फसवणूक सहन करणार नाही. 
- योगीराज गाडे, शिवसेना नगरसेवक 

मनोज कोतकर भाजपचेच आहेत. ते अजूनही भाजपचेच नगरसेवक आहेत. 
- बाबासाहेब वाकळे, महापौर 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics from Manoj Kotkar's party