गावकी हाकण्यासाठी पुढाऱ्यांचा कस; ग्रामपंचायतीत कोणाला द्यायची संधी?

अशोक मुरुमकर
Saturday, 19 December 2020

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस जवळ आला आहे.

अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस जवळ आला आहे. त्यामुळे गावागावांमध्ये पुढाऱ्यांच्याही बैठका वाढल्या आहेत. यात पॅनेल तयार करण्यासाठी गाव पुढाऱ्यांचा कस लागला आहे.

याच कारण मतदान झाल्यानंतर सरपंचाचे आरक्षण पडणार आहे. फक्त बहुमत मिळवून चालणार नाही तर पडणाऱ्या आरक्षणाचा आपल्याकडे उमेदवारही असावा लागणार आहे. 

राज्यात मार्च ते डिसेंबर दरम्यानच्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकाची रणधुमाळी सुरु आहे. यामुळे कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता निवडणुका जाहीर झाल्याने गावांमध्ये नवीन वर्षात नवीन ‘सरकार’ येणार आहे. पॅनेल विजयी करण्यासाठी पुढाऱ्यांचा कस लागला आहे. सरपंचाचे आरक्षण जाहीर नसल्याने नेमका खर्च कोणी करायचा, उमदवार कोण घ्यायचा असा प्रश्‍न पुढाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या गावांमध्ये सात जागांसाठी निवडणुक होत आहे. तिथे सरपंच होण्यासाठी चार सदस्य आवश्‍यक आहेत. चार सदस्य निवडुन आणणेही सोपे आहे. पण त्यात आरक्षण दुसरे पडले तर चार जास्त सदस्य निवडून येऊनही उपयोग होणार नाही.

त्यामुळे पुढाऱ्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. सर्वच जागा विजयी व्हाव्यात यासाठी पुढारी प्रयत्न करत असले तरी गावकीच्या कुरघोडीत आरक्षणाची जागा मजबुत देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी सर्व स्तरातील जनमतातील उमेदवार आपल्याकडे असावेत म्हणून इच्छुकांची हताळणी पुढारी करत आहेत. 

२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रारंभ होणार असून ३० डिसेंबरपर्यंत मुदत आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी सरपंच कोणाचा करायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सध्या सोशल मिडीयावर सरपंच कसा असावा, सदस्य कसा असावा याचे संदेश व्हायरल होत आहेत. त्याचाही प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत. तसा उमेदवार कसा मिळेल याचा शोध गाव पुढारी करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Politics in villages from Gram Panchayat elections