esakal | माजी आमदार कोल्हेंच्या विकासकामांवरच आमदारांकडून नवीन पाट्या
sakal

बोलून बातमी शोधा

Politics from the works of former MLA Snehalta Kolha in Kopargaon

मतदारसंघावर पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तींचे संकट ओढवले त्या- त्या वेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही करून घेत सरसकट भरपाईची मागणी केली. यामुळेच त्यावेळच्या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली.

माजी आमदार कोल्हेंच्या विकासकामांवरच आमदारांकडून नवीन पाट्या

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : मतदारसंघावर पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तींचे संकट ओढवले त्या- त्या वेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही करून घेत सरसकट भरपाईची मागणी केली. यामुळेच त्यावेळच्या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली.

दुसरीकडे निवडणुकीनंतर मतदारसंघासाठी एक छदामही न आणणाऱ्या विद्यमान आमदारांनी कोल्हे यांनी आणलेल्या निधीतील विकासकामांवरच पाट्या लावण्याचे काम चालवले आहे, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केली. 

याबाबत रोहोम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सहा सप्टेंबरला झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी विद्यमान आमदारांनी केली. अशीच मागणी 15 जून 2020 ला याच भागात झालेल्या नुकसानीच्या वेळी केली होती. परंतु तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नाही. केवळ वल्गना करण्यात माहीर असलेल्या आमदारांनी यावेळीही पंचनामे करण्याचे आदेश दिले; परंतु नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होणार असल्याने माजी आमदार कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचे काम केले. तसेच तातडीने भरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

गेल्या पाच वर्षांत कोल्हे यांनी आणलेल्या निधीतील कामांवर फेरफटका मारणे आणि तेथे स्वतःच्या नावाच्या पाट्या लावण्याचे काम करणाऱ्या विद्यमान आमदारांनी मतदारसंघासाठी एक छदाम तरी आणला का, असा सवालही रोहोम यांनी केला. कोल्हे यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची कधीही बरोबरी होणार नाही, हे त्रिवार सत्य त्यांनाही माहीत असल्याने निवडणुकीपासून मतदारसंघासाठी काहीही करू न शकलेल्या आमदारांची पंचनामे करण्याची वल्गना पुन्हा हवेतच विरणार असल्याने त्यांनी कोल्हे यांच्यावर आगपाखड सुरू केल्याचेही रोहोम यांनी नमूद केले.

संपादन : अशोक मुरुमकर