esakal | संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी राज्यमार्गाची दुरावस्था
sakal

बोलून बातमी शोधा

Poor condition of Kolhar Ghoti state highway in Sangamner taluka

संगमनेर या मध्यवर्ती शहराला जोडणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गाची काही दिवसात देखभाल दुरुस्तीअभावी मोठी दुरवस्था झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी राज्यमार्गाची दुरावस्था

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर या मध्यवर्ती शहराला जोडणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गाची काही दिवसात देखभाल दुरुस्तीअभावी मोठी दुरवस्था झाली आहे. शहराजवळच्या ज्ञानमाता विद्यालय व होंडा शोरुम परिसरातील अपघाताला निमंत्रण देणारे मोठे खड्डे बुजवण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

संगमनेर या तालुक्याच्या शहराला राज्यातील प्रमुख शहरांशी जोडण्याचे काम कोल्हार घोटी राज्यमार्ग व नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग करतो. यातील कोल्हार घोटी राज्य मार्गाची काही वर्षात मोठी दुरवस्था झाली आहे. विशेषतः शहरातील तीन बत्ती चौकाजवळून लोणीकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा दुचाकी, चारचाकी गॅरेज व इतर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. 

रस्त्याच्या कडेला ही वाहने उभी असल्यामुळे दुभाजक असलेला रस्ता पुन्हा एकेरीच होतो. हा रस्ता वारंवार दुरुस्त करुनही, तीन बत्ती चौकातील पेट्रोलपंप, परिसरात दुभाजकाच्या सुरवातीला तसेच नाटकी नाल्याच्या पुलाचा परिसर, ज्ञानमाता विद्यालय, होंडा शोरुम या परिसरातील रस्ता मोठ्या आकाराच्या खड्ड्यांमुळे धोकादायक बनला आहे. शेजारुन जाणाऱ्या वाहनाला हुकवताना अनेकदा या खड्ड्यात चाक गेल्याने दुचाकीस्वार धडपडतात. 

सध्या ऐन सणासुदीच्या काळात अद्यापही पावसाची जोरदार हजेरी सुरु असल्याने सततच्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा आकार रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समजत नाही. त्यामुळे वाहने जोरदार आपटून नुकसान होते. आगामी दिवाळी व दसऱ्यानिमित्त तालुक्यातील खेडोपाडीचे शेतकरी, ग्रामस्थांची विविध खरेदीसाठी शहरात वर्दळ वाढल्याने या रस्त्यावरील रहदारी पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे. अनोळखी प्रवाशांसाठी हे खड्डे धोकादायक असल्याने किमान तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image