esakal | वीज बिलात महावितरण पुन्हा घालणार घोळ

बोलून बातमी शोधा

महावितरण लोगो
वीज बिलात महावितरण पुन्हा घालणार घोळ
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने संचारबंदी आहे. काही भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणूनही घोषित करण्यात आले आहेत. अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्‍य नाही. त्यामुळे पुन्हा मागच्या लॉकडाउनसारखा घोळ होण्याची शक्यता आहे. सरकार वीज बिल माफ करणार, नाही करणार अशा संभ्रमात नागरिक होते. त्यामुळे बिलच भरले नाही. परिणामी बिलाचा आकडा वाढत गेला. काहींना अव्वाच्या सव्वा बिले आकारली गेली. मीटरचे रिडिंग न घेतले गेल्याने हा पेच निर्माण झाला होता. काहींची बिल कमी झाले, काहींना तर अजूनही तो रिडिंगचा घोळ कळालेला नाही. महावितरणने आता यावर पर्याय काढला आहे.

मागील वर्षी लॉकडाउनमध्ये महावितरणाला वीज मीटर रिडिंग घेण्यात अडचणी आल्या. त्यामुळे ग्राहकांना सलग तीन महिने सरासरी वीज बिल महावितरणने दिले होते. लॉकडाउन शिथिल झाल्यावर महावीतरणने मीटर रीडिंग घेतल्यावर बिल जास्त आल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. या विरोधात आंदोलनेही झाली होती. ही बाब लक्षात घेत यावेळी महातरणने ग्राहकांनाच मीटर रीडिंग पाठविण्याची व त्यानुसार वीजबिल देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

महावितरणकडून केंद्रीकृत वीजबिल प्रणाली (सेंट्रलाईज बिलिंग सिस्टिम) सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 तारखेपर्यंत एका निश्‍चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्‍चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांक देखील नमूद आहे. रीडिंगच्या या निश्‍चित तारखेच्या एक दिवस आधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची "एसएमएस'द्वारे आवाहन करण्यात येत आहे.

मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अथवा वेबसाईटद्वारे रीडिंग पाठविता येईल. महावितरण मोबाईलमध्ये "सबमीट मीटर रीडिंग 'वर क्‍लीक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रीडिंग पाठवायचे आहे, तो क्रमांक सिलेक्‍ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा.

मीटर रीडिंग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रीडिंगची संख्या व केडब्लूएच (kWh)असे दिसल्यानंतरच (केडब्लू अथवा केव्हीए वगळून) फोटो काढावा. त्यानंतर फोटोनुसार मॅन्यूअली रीडिंगमध्ये नमूद करावे व सबमीट करावे.

मोबाईलमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रीडिंग थेट सबमीट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रीडिंग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल. ज्या ग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवरून फोटो व मीटर रीडिंग अपलोड करायचे आहे त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्‍यक आहे.

स्वतःहून मीटर रीडिंग घेण्याचे फायदे

प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणाऱ्या या प्रक्रियेतून लघुदाब वीजग्राहकांना अनेक फायदे होणार आहेत. स्वतःच्या मीटरकडे व रीडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रीडिंगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष अथवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्‌भवणार नाहीत. रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.