esakal | बटाट्याचा हा आहे रंजक इतिहास, पण ते उपवासाला चालते का?
sakal

बोलून बातमी शोधा

Potatoes are a native American fruit

बटाट्याचा भाज्यांमध्ये उपयोग होतो. परंतु ते उपवासाच्या पदार्थात सर्वाधिक वापरले जाते. वेफर्ससाठी सर्वाधिक उपयोग होतो. खिचडीमध्येही ते आवडीने खाल्ले जाते. मात्र, बटाटे हे कंदमूळ आहे.

बटाट्याचा हा आहे रंजक इतिहास, पण ते उपवासाला चालते का?

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः बटाटा. या फळाविषयी कोणाला माहिती नाही असा एकही माणूस भारतात सापडायचा नाही. बटाट्याने भारताची अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. उत्पादकांसाठी हमखास उत्प्नन्न देणारे पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. खवय्यांसाठी तर बटाटा एकदम आवडीचा. आपल्या संस्कृती आणि धर्मासोबत तो जोडला गेला आहे. स्वप्नांची नगरी समजली जाणारी मुंबई अनेक उपाशीपोटी असलेल्यांची भूक हे बटाटे भागवते. मात्र, त्यासाठी त्याला पावाची साथ घ्यावी लागते एवढेच. 

धर्मकारण, अर्थकारणासोबत जोडला गेलेला हा बटाटा मुळात स्वदेशी आहे का. गोरगरिबांच्या घरातील प्रमुख भाजी कोणती असेल तर ती बटाटा. श्रीमंताच्या ताटातील मेन्यूतही त्याला स्थान आहेच. भारतीय जीवनाशी एकरूप झालेले हे बटाटे मूळचे आहे परदेशी. हे पीक दक्षिण अमेरिकेच्या ‘पेरू’मधील असल्याचे समाजशास्त्रज्ञ सांगतात.

मुळात हे कंदमूळ आहे. स्पॅनिश दर्यावर्दी लोकांनी ते १५८७च्या सुमारास यूरोपमध्ये नेले. पुढे काही वर्षांतच ते भारतात आले. पोर्तुगीज लोकांनी याची भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात लागवड केल्याच्या नोंदी आहेत. पुढे ती पूर्व किनाऱ्यावर म्हणजे बंगालमध्येही गेली.

बटाटा हे पीक सोलॅनेसी (Solanaceas) कुलातील आहे. त्याचे शास्त्रीय नाव  सोलॅनम ट्यूबरोझम (Solanum tuberosum) असे आहे. ते भारतात बटाटा, आलू स्थानिक नावांनी ओळखले जाते. भारतात बटाटे प्रमुख पीक असले तरी चीन उत्पादनात आपल्या पुढे आहे. रशियासह इतर यूरोपातही त्याचे उत्पादन होते.

इथे होते उत्पादन

भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बटाट्याची लागवड प्रामुख्याने केली जाते. या पिकाखालील एकूण क्षेत्राच्या ८०% पेक्षा अधिक क्षेत्र या प्रमुख राज्यांमधील आहे. भारतातील उत्तर प्रदेशात या पिकाचे उत्पादन अधिक होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यात रब्बी हंगामात जास्त प्रमाणात या पिकाची लागवड केली जाते.

हे आहेत औषधी गुणधर्म

शरीराच्या जळलेल्या भागावर ताबडतोब कच्चा बटाटा किसून लावल्याने फायदा होतो. भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. रोज चार शेकलेले बटाटे मीठ आणि काळे मिरे पूड भुरभुरून खाल्ल्याने संधिवात बरा होतो.

या आहेत प्रमुख बाजारपेठा

कलकत्ता आणि मुंबई या बटाट्यांच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. दिल्ली, आग्रा, फरूखाबाद, लखनौ, जलंदर, मेट्टुपलायम (तमिळनाडू), बंगलोर, मद्रास, अहमदाबाद आणि पुणे येथे बटाटा मार्केट आहे.

संशोधन केंद्र

सिमला व तेथून जवळच असलेल्या कुफरी येथे बटाट्यावरील संशोधनाची मध्यवर्ती संस्था (सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट) आहे. तेथे प्रजननाने जास्त उत्पन्न देणाऱ्या व रोगप्रतिकारक बटाट्याच्या प्रकारांची निर्मिती होते. शिवाय देशात सहा प्रादेशिक संशोधन केंद्र आहे. त्यांतील एक महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात राजगुरूनगर (खेड) येथे आहे.

उपवासाला चालते का

बटाट्याचा भाज्यांमध्ये उपयोग होतो. परंतु ते उपवासाच्या पदार्थात सर्वाधिक वापरले जाते. वेफर्ससाठी सर्वाधिक उपयोग होतो. खिचडीमध्येही ते आवडीने खाल्ले जाते. मात्र, बटाटे हे कंदमूळ आहे. त्यामुळे ते उपवासाला चालत नाही, असे काहींचे म्हणणे आहे. परंतु कंदमूळ असलेले रताळे कसे काय चालते, असा प्रतिवादही केला जातो.

बटाटे परदेशी असल्याने त्याविषयी जाणकार हातचा राखून मत व्यक्त करतात. या बटाट्याविषयी छातीठोकपणे कोणीच सांगत नाही की हे उपवासाला चालते. उपवास करणे म्हणजे पोटाला आरामाचा दिवस आहे. त्यादिवशी फक्त फलाहार करायचा. त्याचा अपभ्रंश फराळ झाला. मग सुरू झाली शाबूदाणा खिचडी, त्यात बटाटेही वापरले जाऊ लागले, असे भारतीय समाजशास्त्राचे अभ्यासक प्रकाश कुलकर्णी सांगतात.

बटाटे हे मूळ परदेशी असले तरी ते भारतीय माणसाच्या भावनेशी जोडले आहे. ज्यांना बटाट्याचा इतिहास माहिती आहे ते उपवासाला बटाटे खाण्याचे टाळतात. इतरांना मात्र ते पटत नाही. त्यामुळे काय चालते काय नाही हे प्रत्येकाच्या श्रद्धेशी निगडित आहे. त्याविषयी इतरांनी कोणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू नये, असेही कुलकर्णी सांगतात.

संपादन - अशोक निंबाळकर