
शिर्डी ः कॉंग्रेस सर्वशक्तीमान असताना, ज्यांनी बंड केले, त्यांच्या पदरात पक्षनेतृत्वाने भरभरून दान टाकले. मात्र, पुढे त्यांचे आणि हायकमांडचे सूर कधीच जुळले नाहीत. दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या बंडखोरीने हे सिद्ध केले.
दिल्लीश्वरांचे विश्वासू म्हणून आमदार पृथ्वीराज चव्हाण एके काळी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसले. त्यांनीही पत्राद्वारे सल्ला देताच, पक्षश्रेष्ठींची नाराजी सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. विशेष म्हणजे, देशपातळीवर गाजलेल्या या घडामोडींचा प्रारंभ शिर्डी लोकसभा मतदारसंघातूनच झाला.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे पक्षाचे सर्वशक्तीमान नेते असताना, विखे पाटील यांनी फोरमची संकल्पना मांडली. सामुहिक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली. पुढे ज्येष्ठ नेते प्रणवदा यांनीही सर्व संमतीने पंतप्रधान निवडीचा आग्रह धरला. त्याची किंमत या दोन्ही नेत्यांना मोजावी लागली. कोंडी झालेल्या खासदार विखे पाटील यांनी संधी मिळताच, बंडाचा झेंडा फडकावला. त्यानंतर पुढे हे दोघेही स्वगृही परतले. कॉंग्रेसने आमदार विखे पाटील यांना मंत्रीपद, नंतर विरोधी पक्षनेते पदाची संधी दिली. माजी खासदार विखे पाटील यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला. तथापी हायकमांडसोबत त्यांचे सूर पुन्हा जुळले नाहीत.
(स्व.) प्रणवदा यांनी स्वतःचा पक्ष काढून पश्चिम बंगालमध्ये बंडाचा झेंडा फडकाविला. मांडलेला खेळ रंगत नसल्याने, तो मोडून ते पुन्हा स्वगृही परतले. पुढे पक्षाने त्यांना राष्ट्रपतिपद बहाल केले. मात्र, शेवटपर्यंत त्यांचे आणि दिल्लीश्वरांचे सूरकाही जुळले नाहीत.
राष्ट्रपतिपदावरून पायउतार झाल्यावर त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जाणे पक्षश्रेष्ठींना रुचणारे नव्हते. केंद्रीतील भाजप सरकारने त्यांना भारतरत्न दिला नि पक्षश्रेष्ठींसोबत त्यांचा दुरावा वाढतच गेला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे तर दिल्लीश्वरांचे निष्ठावंत नेते. त्यांनी सामुहिक मंथन करून पक्षाने रणनीती ठरवावी. पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष असावा, अशी मागणी करणाऱ्या पत्रावर सही केली. मात्र, हे पत्र दिल्लीश्वरांना आवडले नाही. त्यांच्या वाट्यालाही नाराजी आली. विशेष म्हणजे या सर्व घडामोडींचा प्रारंभ शिर्डी लोकसभा मतदारसंघातूनच झाला होता.
रूचले नाही, ते स्पष्ट सांगण्याची धमक दिवंगत राष्ट्रपती प्रणवदा व दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यात होती. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे त्यावेळी आपले विचार मांडण्याचे धाडस त्यांनी दाखविले. त्याची किंमतही मोजली. शिर्डी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातून या घडामोडींची बिजे रोवली गेली, हे मात्र खरे. आज कॉंग्रेसमध्ये जे काही चालले आहे, ते पाहिले की या दोन्ही नेत्यांचे म्हणणे पटते. राजकारणात वेळ आल्यानंतर काही निर्णय घ्यावे लागतात, ते त्यांनी घेतले.
- आमदार राधाकृष्ण विखे पाटील , शिर्डी.संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.