
एका अपघातात तिला व तिच्या गोंडस बाळाला एकटे सोडून आयुष्याचा जोडीदार दूरच्या प्रवासाला निघून गेला... अवघ्या तीन वर्षांत होत्याचे नव्हते झाले.. या अंधारातही प्रकाशाचा कवडसा दिसला.
सोनई (अहमदनगर) : सप्तपदी चालत नव्या घरात तीचे आगमन झाले.. नव्या स्वप्नांसह तिचा प्रवास सुरू झाला.. मनासारखा जोडीदार मिळाला.. सगळं काही स्वप्नवत चालले होते.. आणि अचानक तिच्या सोन्यासारख्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली.
एका अपघातात तिला व तिच्या गोंडस बाळाला एकटे सोडून आयुष्याचा जोडीदार दूरच्या प्रवासाला निघून गेला... अवघ्या तीन वर्षांत होत्याचे नव्हते झाले.. या अंधारातही प्रकाशाचा कवडसा दिसला. विधवा भावजयीसोबत लग्न करण्यासाठी तिचा छोटा दीर तयार झाला.. तिच्या आयुष्यात नवी पहाट झाली..!
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वडाळा बहिरोबा येथील ही घटना. राहुरी फॅक्टरी येथील बाळासाहेब गव्हाणे यांची कन्या प्रांजली हिचा 2017मध्ये वडाळा बहिरोबा येथील संजय मोटे यांचे चिरंजीव महेश यांच्यासोबत विवाह झाला. या दाम्पत्याच्या वेलीवर गोंडस बाळाच्या रुपाने फूल उमलले. सारं काही आनंदात चालले होते. मात्र, अचानक नगर-औरंगाबाद रस्त्यावर अभियंता महेश यांचे अपघाती निधन झाले. सुखाचा संसार दुःखाने भरला. गव्हाणे आणि मोटे परिवार या आघाताने नि:शब्द झाले. प्रांजलीच्या पुढे सारे आयुष्य पडले होते. भविष्यात तिचे कसे होणार, या चिंतेत दोन्ही परिवार बुडाले.
वडाळ्याच्या सरपंच मीनल मोटे, सामाजिक कार्यकर्ते चांगदेव मोटे व दत्तात्रेय मोटे यांनी विधवा प्रांजलीचे सासरे संजय मोटे यांच्याशी चर्चा केली. अभियंता असलेल्या दीर महेंद्र यांच्याशी प्रांजलीचा विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. सासरा, दीर व कुटुंबाने मनाचा मोठेपणा दाखवत, हे नवे नाते स्वीकारले.
सासरे संजय मोटे यांनी वडिलांची भूमिका स्वीकारत विधवा सुनेचे कन्यादान करण्याचा निर्णय घेतला. 7 जानेवारी 2021 रोजी नात्याने दीर-भावजय असलेले हे दाम्पत्य विवाहबंधनात अडकणार आहे. मोटे परिवाराचा हा आगळा-वेगळा आदर्श परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
जावयाच्या अपघाती निधनानंतर आम्ही सर्व आता मुलीचे कसे होणार, या चिंतेत होतो. व्याही संजय मोटे यांनी सूनेला मुलगी समजून विवाहाचा निर्णय घेतला. दीराने दिलेला होकार आमच्यासाठी देवाचीच कृपा आहे, असे बाळासाहेब गव्हाणे (वधूपिता, राहुरी फॅक्टरी) म्हणाले.
सून आणि नातवाकडे पाहून मन अस्थिर होत होते. हीच आपली लेक समजून, लहान मुलाबरोबर मित्राच्या नात्याप्रमाणे बोललो. त्यानेही मनाचा मोठेपणा दाखवित विवाहास होकार दिला. आता मनं हलक झालं.
- संजय मोटे, वरपिता, वडाळा बहिरोबा, ता. नेवासे
संपादन : अशोक मुरुमकर