राहात्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डांगेंना राष्ट्रपती पदक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक इंद्रभान डांगे यांचे मेघश्‍याम धाकटे बंधू आहेत. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच शैक्षणिक संकुलात पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

राहाता ः राष्ट्रपती पारितोषक जाहीर झाल्याची माहिती समजताच खूप आनंद झाला. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पोलिस उपनिरीक्षक झालो. गायींचे संगोपन ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि आता राष्ट्रपती पुरस्कार.

या वाटचालीत आई व मोठे भाऊ प्राचार्य इंद्रभान डांगे यांची खंबीर साथ लाभली. या यशात माझ्या परिवाराचा मोठा वाटा आहे. एका अर्थाने हा राहाता परिसर व नगर जिल्ह्याच्या सन्मान आहे, अशा शब्दांत यंदाचा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघःशाम दादा पाटील डांगे यांनी "सकाळ'शी बोलताना भावना व्यक्त केल्या. 

प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक इंद्रभान डांगे यांचे मेघश्‍याम धाकटे बंधू आहेत. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच शैक्षणिक संकुलात पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. त्यांचे बंधू शशिकांत डांगे, शिवाजी डांगे, भगवान डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, स्नेहलता डांगे, पूनम डांगे आदी उपस्थित होते. या सर्वांनी मोबाईलद्वारे त्यांचे अभिनंदन केले. 
ते म्हणाले, ""नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हा अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. तेथील पोलिस ठाण्याची जबाबदारी सांभाळताना सामाजिक सलोख्याला महत्त्व दिले. त्यासाठी विविध उपक्रम राबविले. कायदा-व्यवस्था उत्तम राखली. पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली. रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी लोकसहभागातून विवीध उपक्रम राबवले. उल्हासनगर गुन्हे शाखेत असताना ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने पाच ज्येष्ठांचे खून झाले. हे कृत्य करण्याला टोळीला पकडून आरोपींना मोक्का लावला. याच भागात बनावट क्रेडीट कार्ड तयार करून, लोकांचे लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीला पकडले. एक हजार बनावट क्रेडीट कार्ड जप्त केले. आजवरच्या कामगिरीची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड झाल्याचा आनंद वाटतो.'' 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे हे सध्या कोथरुड (पुणे) पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. घरी शेतात राबून व गायींचे संगोपन करून त्यांनी स्वतःचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. स्पर्धापरीक्षेत यश संपादन केले. त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याचे पत्र घेऊन पोस्टमन घरी आला, त्यावेळी ते गायींची धार काढत होते. ही आठवण डांगे कुटुंबीय कधीही विसरणार नाही. 
- प्राचार्य इंद्रभान डांगे, प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुल, राहाता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President's Medal to resident senior police inspector Dange