‘या’बाबत शरद पवारांशी चर्चा झाली आहे, भाजपचे खासदार डॉ. विखे यांच्याशी समन्वय ठेऊ

विलास कुलकर्णी
Wednesday, 19 August 2020

राहुरी, नगर व पारनेर तालुक्यात 'के. के. रेंज'च्या प्रस्‍तावित विस्तारीकरण क्षेत्रातील गावांमध्ये भारतीय सैन्य दलाचे अधिकारी दररोज सर्वेक्षण करीत आहेत. त्यामुळे, नागरिकांमध्ये संभ्रम व भीती पसरली आहे.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी, नगर व पारनेर तालुक्यात 'के. के. रेंज'च्या प्रस्‍तावित विस्तारीकरण क्षेत्रातील गावांमध्ये भारतीय सैन्य दलाचे अधिकारी दररोज सर्वेक्षण करीत आहेत. त्यामुळे, नागरिकांमध्ये संभ्रम व भीती पसरली आहे.

नागरिकांनी घाबरू नये. या प्रश्नावर लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासह आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे तीव्र विरोध करू. खासदार डॉ. सुजय विखे यांच्याशी समन्वय ठेवू. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासमवेत लवकरच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर बैठक घेऊन, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
 

बुधवारी राहुरी कृषी विद्यापीठ येथे पत्रकार परिषदेत मंत्री तनपुरे बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे उपस्थित होते. मंत्री तनपुरे म्हणाले, सैन्य दलाचे अधिकारी सर्वेक्षण करीत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये जमिनींच्या अधिग्रहणाविषयी संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. मुळा धरणात जमिनी गेलेल्या विस्थापित नागरिकांचे पुनर्वसन होऊन, एक पिढी स्थिरस्थावर झाली. धरणामुळे जमिनी बागायती झाल्या. पुन्हा, के. के. रेंजची टांगती तलवार डोक्यावर असल्याने घबराट पसरली आहे. के. के. रेंजच्या विस्तारीकरणात मुळा धरणाला धोका होऊ शकतो. दुसरीकडे जिरायत जमीनी अधिग्रहित कराव्यात. अशी आमची भूमिका आहे.
 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आम्ही भेट घेऊन व्यथा मांडली. त्यांच्यासमवेत संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या प्रश्नावर सर्व लोकप्रतिनिधी पक्षभेद विसरून एकत्र जनतेच्या पाठीशी राहू.

सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी जमिनींचे उच्च मूल्यांकन व औद्योगिक प्रयोजनाची माहिती घेण्यासाठी मूल्यांकनाची माहिती घेतली असल्याचे समजते. त्याविषयी नगर येथील सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. जय जवान. जय किसान याचा समतोल राहावा. यासाठी अग्रभागी राहू. असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Press Conference of Minister Prajakt Tanpure at Rahuri regarding KK Range