esakal | पोलिस असल्याचा बहाणा करून सेवानिवृत्त सेवकाला लुटले; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

पोलिस असल्याचा बहाणा करून सेवानिवृत्त सेवकाला लुटले; गुन्हा दाखल

sakal_logo
By
टिम ई-सकाळ

पारनेर (जि. अहमदनगर) : पोलिस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला पारनेर शहरात भर दिवसा लुटल्याची घटना घडली. या लुटीत खिशातील १८ हजार रुपये, तसेच अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी रुमालात बांधून देत असल्याचे नाटक करीत हातचलाखी करून, रोख रकमेसह सोन्याची अंगठी घेऊन चोरट्याने पोबारा केला. (Pretending to be a policeman a retired teacher was robbed in Parner)


पारनेर पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर पारनेर- अळकुटी रस्त्यावर असलेल्या आयटीआय कॉलेजसमोर आज (ता. सहा) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. अळकुटी रस्त्यावर संकेत गॅस एजन्सीजवळ राहत असलेले निवृत्त माध्यामिक शिक्षक अच्युतराव जगदाळे पारनेर शहरातून आपल्या घरी जात होते. त्याच वेळी एक तरुण त्यांच्यामागून दुचाकीवरून आला. त्याने जगदाळे यांना थांबवून, ‘मी पारनेर पोलिस ठाण्यात नुकताच बदलून आलो आहे. या परिसरात एक जण गांजाविक्रीचा व्यवसाय करतो आहे. त्याचा तपास मी करत आहे. तो कोठे राहतो,’ असे विचारले असता, जगदाळे यांनी ‘मला माहीत नाही’ असे सांगितले. त्यानंतर, ‘तुम्ही खरोखर पोलिस आहात का? तुमचे ओळखपत्र दाखवा,’ असे जगदाळे म्हणाले. त्याच वेळी समोरून एक तरुण आला व तेथे थांबला. या तोतया पोलिसाने त्याच्या हातात ओळखपत्र दिल्यानंतर तो तरुणही ‘हा पोलिसच आहे’ असे म्हणाला. या तोतया पोलिसाने प्रथम समोरून आलेल्या त्या तरुणाजवळील पैसे व साहित्य रुमालात बांधून त्याच्याजवळ दिले. त्यानंतर जगदाळे यांच्या खिशातील १८ हजार रुपये व हातातील अर्ध्या तोळ्याची अंगठी जगदाळे यांच्याच रुमालात बांधण्याचे नाटक करीत हातचलाखी करून पैसे व अंगठी घेऊन पोबारा केला. जगदाळे यांना त्यांचा रुमालात डायरी घट्ट गाठी मारून दिली. पुढे जगदाळे यांनी रुमालाच्या गाठी सोडून पाहीपर्यंत तोतया पोलिसांनी पोबारा केला. याबाबत जगदाळे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: राज्यात डिजिटल सातबारा उताराचा नवा उच्चांक

loading image