
तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी गहू, हरभरा, ज्वारीसह भाजीपाला उत्पादन घेत आहेत.
नगर तालुका ः कोथिंबीरीचे दर वाढले की मध्यमवर्गीय परेशान होतात. शेतकऱ्याला किती भाव मिळतो याची चर्चा होते. मात्र, दर कोसळले की कोणी त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाही. दर नेमके किती कोसळावेत, याला काही सीमा नाही. नगरच्या बाजारात असे घडते आहे. पदर पैसे देऊन कोथिंबिर शेतकऱ्यांना विकावी लागली.
कोथिंबिरीच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी त्याची विक्री बंद केली आहे. शेतातील कोथिंबिरीचे पाणी तोडून त्यात नांगर फिरविण्याच्या तयारीत शेतकरी आहे. जे शेतकरी बाजारात माल आणतात त्यांना भाड्याचा खर्चही निघत नाही. त्यामुळे पदरचे पैसे घालून कोथिंबिर विक्री करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार होत आहे.
तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी गहू, हरभरा, ज्वारीसह भाजीपाला उत्पादन घेत आहेत. नगर तालुक्यातील काही भागात यंदा मोठ्या प्रमाणात कोथिंबिरीचे उत्पादन घेण्यात आले.
हेही वाचा - नियती किती क्रूर असते बघा
त्यामुळे त्याच्या भावात अचानक घसरण झाली. मागील महिन्यात 10-20 रुपयांपर्यंत विकणाऱ्या जुडीला आता एक रुपयाचाही भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना बाजारात कोथिंबिर आणायलाही परवडत नाही. शेतातून कोथिंबिर काढून तिच्या जुड्या बांधून विक्रीस आणण्यासाठी लागणारा खर्चही अधिक होतो.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबिरीच्या पिकात जनावरे सोडली. पीक मोडण्यासाठी त्यात नांगर घालण्याच्या हालचाली सुरू आहेत.
नगरच्या बाजारात एका शेतकऱ्याने कोथिंबिरीची जुडी दोन रूपयांना विक्रीसाठी लावली तर ग्राहक म्हणाले, "आणखी दोन द्या ना..." तेव्हा संयम सुटलेला शेतकरी म्हणाला, "कोथिंबिरीच्या विक्रीतून भाडंही निघायचं नाही. पदर पैसे देऊन विकायची वेळ आलीय, अशी असते शेती साहेब आतबट्ट्याची." मग ते साहेब, काही न बोलताच निघून गेले.
संपादन - अशोक निंबाळकर