साजन शुगरची दरात आघाडी; पहिला हप्ता प्रतीटन 2300 तर नागवडे व कुकडीचा 2100

संजय आ. काटे
Saturday, 26 December 2020

दोन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या साखर कारखान्यांचा गाळप हंगामाने आता जोर पकडला आहे.

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्यात दोन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या साखर कारखान्यांचा गाळप हंगामाने आता जोर पकडला आहे. आजअखेर तालुक्यातील तिनही कारखान्यांनी जवळपास पावणेसात लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे.

गाळपात नागवडे कारखान्याने आघाडी घेतली मात्र दरात देवदैठण येथील साजन शुगरने दरात आघाडी घेताना पहिला हप्ता दोन हजार तीनशे रुपये प्रतीटनाने काढला आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यात यंदाच्या गाळपात कारखान्यांची दराची स्पर्धा होणारे आहे. नागवडे व कुकडी कारखान्यांची निवडणूक काही महिन्यांवर आल्याने या दोन्ही कारखान्यांकडून जास्तीच्या दराची अपेक्षा लागली आहे. मात्र या दोन्ही कारखान्यांवर सरशी करीत साजन पाचपुते यांच्या साजन शुगर कारखान्याने आघाडी घेतली आहे. साजन शुगरने आजपर्यंत एक लाख तीस हजार मेट्रीक टनाचे गाळप केले. पहिला हप्ता दोन हजार तीनशे रुपयांनी काढला आहे. 

नागवडे कारखान्याने गाळपात नेहमीप्रमाणे आघाडी घेतली आहे. आजअखेर दोन लाख 72 हजार मेट्रीक टनाचे गाळप केले आहे. त्यांचा पहिला हप्ता दोन हजार शंभर रुपयांचा आहे. कुकडी कारखानाही नागवडेच्या पाठीमागेच असून त्यांनी आजपर्यंत दोन लाख 65 हजार मेट्रीक टनाचे गाळप केले आहे. त्यांनीही पहिला हप्ता दोन हजार शंभर रुपये काढला आहे. 

शेतकऱ्यांच्या उसाला कुठलीही चर्चा न करता जास्तीचा दर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापुढील हप्तेही चांगलेच राहतील याची खात्री शेतकऱ्यांनी बाळगावी. 
- साजन पाचपुते, अध्यक्ष साजन शुगर, देवदैठण 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The price of Rs 2300 from Sajan Sugar in Shrigonda taluka