कोविड रुग्णालयासाठी धावले खासगी डॉक्‍टर

विलास कुलकर्णी
Monday, 14 September 2020

राहुरी व देवळाली प्रवरा येथे खासगी डॉक्‍टर संचालित, प्रत्येकी 50 खाटांचे कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी व देवळाली प्रवरा येथे खासगी डॉक्‍टर संचालित, प्रत्येकी 50 खाटांचे कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सेंट्रलाइझ्ड ऑक्‍सिजन सुविधेसह तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक कोरोना रुग्णांवर उपचार करणार आहेत. राहुरी फॅक्‍टरी येथील शासनाच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये सेंट्रलाइझ्ड ऑक्‍सिजन सुविधा उपलब्ध करून, कार्डियाक ऍम्ब्युलन्स मिळविण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी पुढाकार घेतला आहे. 

राहुरी फॅक्‍टरी येथे शासनाच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असल्याची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनास जाग आली. देवळाली प्रवरा पालिकेच्या सभागृहात शनिवारी कानडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, मुख्याधिकारी अजित निकत, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा डोईफोडे, गटविकास अधिकारी गोविंद खामकर उपस्थित होते. 

राहुरी फॅक्‍टरी येथे शासनाच्या कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन वेळा चहा, सकाळी नाश्‍ता व दोन वेळा जेवण सुरळीत मिळण्यासाठी ठेकेदाराला सूचना करण्यात आली. राहुरी फॅक्‍टरी हेल्थ सेंटर व कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांना मंजुरी देण्यात आली. देवळाली प्रवरा येथे पालिकेच्या मालकीची व्यायामशाळेची इमारत कोविड हेल्थ सेंटरसाठी देण्यास नगराध्यक्ष कदम यांनी पुढाकार घेतला. तेथे 50 खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहे. बालाजी मंदिर ट्रस्टचे मंगल कार्यालय किंवा राहुरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तेथेही शहरातील खासगी डॉक्‍टर रुग्णांवर उपचार करणार आहेत. 

तहसीलदार शेख म्हणाले, की खासगी डॉक्‍टरांच्या पुढाकारातून होणाऱ्या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर माफक दरात उपचार करण्यात येणार आहेत. विनामूल्य जागा उपलब्ध झाल्यास, शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दरात रुग्णांवर उपचार होतील. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private doctor service at Kovid Hospital in Rahuri taluka