बापरे! ४०० नागरीकांचा सांभाळ एका पोलिसाकडे

गौरव साळुंके
Friday, 31 July 2020

तालुका पोलिस ठाण्यातील संख्याबळ अपुरे असल्याने पोलिसांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील तालुका पोलिस ठाण्यातील संख्याबळ अपुरे असल्याने पोलिसांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्याचे कार्यक्षेत्रात ३७ गावे आहेत. येथे सव्वा लाख नागरीकांमागे अवघे ४९ पोलिस कर्मचारी आहेत. त्यामुळे गुन्ह्यांची नोंद घेउन तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. 

तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत चार पोलिस चौक्या आहेत. त्यातुन ग्रामीण भागात नियंत्रण असते. तालुका ठाण्यात पोलिस निरिक्षक एक, सहायक पोलिस निरिक्षक एक, सहायक फौजदार सहा व १२ हवालदार, ११ पोलिस नाईक, १४ पोलिस शिपाईसह चार कर्मचारी असा ४९ पोलिसांचा फौजफाटा आहे.

त्यात आठ महिला तर ४१ पुरुष पोलिस कर्मचारी असुन मदतीसाठी पाच गृहरक्षक (होमगार्ड) आहेत. तालुक्यातील पोलिसांची संख्या अपुरी असल्याने पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. एका पोलिसांवर अनेक गावाची जबाबदारी आहे. काम कुठलेही असोत कारवाई पोलिसांना करावी लागते. त्यात वाहन व्यवस्थाही तोडकी आहे.

कोरोनाच्या कहरात दोन कैदी रात्री पसार झाल्याप्रकरणी चार तालुका हवालदारांना नुकतेच निलंबित केले. तर कारागृहातील कैद्यांमुळे चार शहर पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला. पोलिसांना २४ तास काम असल्याने कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. सरकारी कर्मचारी आठ तास नोकरी करतात. परंतू पोलिसांचे काम सकाळी ते रात्री आणि रात्री सकाळी असे १२ तास असते. कामाच्या वेळेत गुन्हा घडल्यास तो नोंदविण्यापर्यंत १४ ते १६ तास काम करावे लागते. त्यात बंदोबस्तची कामे हमखास येतात.

गुन्हे नियंत्रणसाठी सतत सर्तक रहावे लागते. कामाच्या ओघात जेवणासाठी अनेकदा वेळही मिळत नाही. बंदोबस्त काळात रस्त्यावर चहा बिस्कीट वडापाव खावुन भागवावे लागते. रजा असल्या तरी संख्याबळ अपुरे असल्याने अनेकदा रजाही मंजुर होत नाही. आजरी पडल्यावर उपचार घेवून कामावर हजर राहावे लागते. गुन्हे नोंदवण्यासाठी हवालदार १२ तास कार्यालयात उपस्थित असतात. तर बीट मार्शलांना गस्त घालावी लागते. 

तपासासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. आपतकाळात सुट्ट्या, रजा रद्द केल्या जातात. सणासुदीच्यावेळी सर्व कुटुंबासमवेत सण साजरे करतात. परंतू पोलिस रस्त्यावर तैनात असतात. पुरूष पोलिसांना धावपळीच्या सामना करावा लागतो. तर महिला पोलिसांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळुन नोकरी करावी लागते. सध्या तालुका पोलिस ठाण्यात अपुरे संख्याबळ असल्याने पोलिसांवरील ताण वाढत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Problems due to police in Shrirampur taluka police station