नेत्यांनो, थांबा! निष्ठावंतांना संधी द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prominent leaders should not impose nominations from the house Babasaheb Bhos

नेत्यांनो, थांबा! निष्ठावंतांना संधी द्या!

श्रीगोंदे - तालुक्यातील सातपैकी चार जिल्हा परिषद गट आरक्षित झाले आहेत. कसे झाले, यात काही गोंधळ आहे का, ही बाब बाजूला ठेवली, तरी आता नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कार्यकर्त्यांमुळे पदे, सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आता जे गट खुले झाले आहेत, तेथे नेत्यांनी घरातील व्यक्तीला उमेदवारी देऊ नये. या जागांवर कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते व नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या गटांच्या आरक्षणानंतर भूमिका ‘सकाळ’कडे मांडताना भोस म्हणाले, की एक गट व दोन पंचायत समिती गण वाढल्यानंतर एवढी मोठी खळबळ उडेल, असे वाटले नव्हते. एक अथवा दोन गट आरक्षित होतील, असे जाणकार म्हणत असताना, थेट चार गट आरक्षित झाले. यातच पाचपुते, नागवडे व जगताप यांचे गट खुले राहिल्यावर सर्वपक्षीय कार्यकर्ते अस्वस्थ झाले. तालुक्याच्या राजकारणात नेमके काय सुरू आहे, याची खुलेआम चर्चा सुरू झाली. प्रमुख नेत्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

भोस म्हणाले, की सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, नेत्यांच्या घरातील उमेदवारी कोण करणार, हे अगोदर ठरलेले दिसते. त्यांच्यासाठी आरक्षणही सोयीचे पडल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. आमदार बबनराव पाचपुते यांच्या घरातील व्यक्ती काष्टी गटातून, कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या घरातील व्यक्ती लिंपणगाव गटातून, तर माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणोती जगताप निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट आहे. या नेत्यांना आता इतर गटांकडे त्यादृष्टीने लक्ष देण्याची गरज राहिलेली नसल्याची चर्चा आहे.

भोस म्हणाले, की मुळात जे कारखानदार आहेत, त्यांनी इतर कुठल्याही निवडणुकांत उमेदवारी न केलेली बरी! कारण, एक सत्ता असलेल्याना दुसरी कशासाठी हवी? ज्यांच्याकडे काहीच नाही, मात्र लोकसंपर्कात आहेत, त्यांनाच आमदारकी लढण्याचा सर्वाधिक हक्क आहे. भविष्यात त्यादृष्टीने विचार व्हावा.

आमदारकीच्या स्वप्नामुळे थांबावे

आमदार पाचपुते यांच्या घरात महत्त्वाची पदे व कारखान्यांची सत्ता आहे. त्यामुळे काष्टीत त्यांनी कार्यकर्त्यांना संधी द्यावी. नागवडे यांच्या कुटुंबात कारखाना, जिल्हा बँक, काँग्रेस पक्षाची पदे असल्याने त्यांनी लिंपणगाव गटात कुटुंबातील उमेदवारीबाबत थांबावे. राहुल जगताप यांच्याकडे कारखाना, बँक आदी पदे असल्याने तेथे दुसऱ्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. या तिन्ही नेत्यांचे आमदारकीचे स्वप्न असल्याने त्यांनी थांबावे, अन्यथा कार्यकर्त्यांना केवळ सतरंज्या उचलण्यासाठी ठेवायचे का, हेच सत्य समोर येईल, अशीही भीती भोस यांनी व्यक्त केली.

Web Title: Prominent Leaders Should Not Impose Nominations From The House Babasaheb Bhos

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..