
जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराने सध्या वेग घेतला असून, गावपातळीवरील राजकारणात आता राज्य, राष्ट्रीयस्तरावरील पक्षांच्या नेत्यांनीही उडी घेतली आहे.
नगर तालुका ः नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने आता वेगळाच रंग घेतला आहे. यात भाऊबंधकीची बंधणे शिथिल होत आहेत. शिथिल झालेल्या बंधनांतील बाजूंना बळ देण्यासाठी शहरी भागातील दिग्गजांनी मैदानात उतरत प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुढाकार घेतलेला आहे. यात शिवसेनेचे नेते प्रामुख्याने दिसत आहेत.
जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराने सध्या वेग घेतला असून, गावपातळीवरील राजकारणात आता राज्य, राष्ट्रीयस्तरावरील पक्षांच्या नेत्यांनीही उडी घेतली आहे.
हेही वाचा - शेवटचं मंगलाष्टक सुरू असताना सुरू झाली धावपळ, मांडवाचं झालं स्मशान
या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे प्रत्यक्ष चिन्ह नसले, तरी आगामी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय निवडणुकीत या ग्रामीण मतदारांचा मोठा सहभाग असल्याने गावपातळीवर त्यांना ताकद देण्याचे काम सध्या सर्वच पक्ष करीत आहेत.
नगर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्व ताकद लावली असून, या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे करीत आहेत.
शहर आणि तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत शिवसैनिक एकमेकांना प्रचारासाठी मोलाची मदत करतात. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शहरातील शिवसेना नेते माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे या "शहरी वाघां'नी आपल्या शहरी सैनिकांसह तालुक्यातील शिवसेनेच्या आघाडीच्या संदेश कार्ले, रामदास भोर, राजेंद्र भगत, प्रवीण कोकाटे यांच्या वाघगर्जेनेत सहभागी होत तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींच्या बैठका, प्रचाराचे नियोजन, प्रचार फेऱ्या, सभांनी तालुक्याच्या प्रचारात वेग घेतला आहे.
सध्या शनिवार, रविवार व सुटीचा दिवस याचा पुरेपुर वापर प्रत्येक उमेदवार करून घेत आहेत. शनिवारी पिंपळगाव माळवी, रविवारी बुऱ्हाणनगर येथून प्रचाराचा प्रारंभ केला.
या प्रचाराच्या नियोजनात शिवसेनेबरोबरच राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री उषा तनपुरे यांनी आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खंद्या कार्यकर्त्यांसह नगर तालुक्यातील जेऊर व नागरेदेवळे या दोन जिल्हापरिषद गटात महाविकास आघाडीसाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
या ग्रामपंचायतीच्या प्रचारात भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचे थोरले बंधू अप्पासाहेब कर्डिले व पुतणे रोहिदास यांनीही महाआघाडीच्या प्रचारात उतरले आहेत. नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने प्रचाराचा वेग घेतला असून, येत्या चार दिवसांत तालुका प्रशासनाला व पोलिस विभागाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.