
शेवटची मंगलाष्टकातील आता सावधान समयो...असे बोल म्हटले जात होते. तेवढ्यात वराच्या छातीत कळ निघाली तो खाली कोसळला.
कर्जत : शेवटची मंगलाष्टक सुरू होते, आता सावध सावधान म्हणाल्यानंतर आपण आपल्या जीवनसाथीला पुष्पहार घालून कायमची अर्धांगिनी करण्याचे स्वप्न पाहत असताना नवरदेव अचानक कोसळला. आणि मांडवात एकच धावपळ उडाली.
आनंदाचे उधाण आलेल्या आणि पाहुणे मित्रमंडळी सगेसोयरे यांच्या उपस्थितीने भरगच्च भरलेल्या मांडवातील आनंदाचे रूपांतर दुःखात झाले. क्षणातच स्मशान शांतता पसरली.
तालुक्यातील चिलवडी येथील मुलीचा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील पंचवीस वर्षांच्या युवकाबरोबर विवाह ठरला होता.आज ठरल्या दिवशी सर्व धार्मिक विधी सकाळी पार पडले. हळदी आणि इतर रंग उधळले गेले. डीजे तालावर नवरदेवासह मित्रमंडळीही नाचली.
हेही वाचा - मोबाईल मॅपने केला घात, पुण्याचे तिघे कोसळले धरणात
दुपारी शुभविवाह सुरू झाला. वधू आणि वरांचे मामा पाठीमागे पुष्पहार आणि गुच्छ घेऊन उभे होते.दोन्ही विहीणबाई मोठ्या आनंदात पाहुण्यांचे स्वागत करीत होत्या. मान्यवरांनी आशीर्वाद देऊन झाले.
शेवटची मंगलाष्टकातील आता सावधान समयो...असे बोल म्हटले जात होते. तेवढ्यात वराच्या छातीत कळ निघाली तो खाली कोसळला. मांडवात एकच धांदल उडाली. आनंदाचे फुललेले चेहरे दुःखाने आक्रंदले.
तातडीने त्याला गाडीत घालून उपाचारासाठी नेले. परंतु काही वेळाने त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि सारे होत्याचे नव्हते. झाले. मांडवात स्मशान शांतता पसरली.