जनावरांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी लावल्या संरक्षक जाळ्या

राजू घुगरे 
Wednesday, 2 December 2020

बिबटयाच्या वावरामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

अमरापूर (अहमदनगर) : बिबटयाच्या वावरामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नसल्याने अनेक भागात शेतीची कामे ठप्प झाली आहेत. रात्री अपरात्री वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांनी संरक्षणासाठी संरक्षक जाळ्या, तारकंपाऊंड करण्यास सुरुवात केली आहे. 

शेजारील पाथर्डी तालुक्यात तीन बालकांचा बळी घेत बिबटयाने रहिवाशी भागात धुमाकुळ घातला आहे. या भागाला लागूनच असलेल्या तालुक्यातील वाघोली, वडुले, दिंडेवाडी, आव्हाणे, ढोरजळगाव, अमरापूर, मळेगाव, सामनगाव या परिसरात बिबटयाचा वावर असल्याचा अनेक खुना शेतक-यांच्या निदर्शनास आल्या आहेत.

अनेक शेतक-यांनी बिबटयाचे समक्ष दर्शन झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतात कामासाठी जातांना गटागटाने भितीच्या सावटाखाली जात आहेत. ऊस, तुर, ज्वारी, कपाशी, फळबागा ही पिके उंच वाढलेली असल्याने बिबटयास लपण्यासाठी नैसर्गिक आश्रय निर्माण झाला आहे. त्यातच रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी, कापूस वेचण्यासाठी शेतक-यांना शेतात जावे लागते. अशा स्थितीत महिला, लहान मुले प्रचंड दहशतीखाली आहेत.

पश्चिम भागात शेतात जाण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याने शेतीचे कामे मोठया प्रमाणात खोळंबली आहेत. तर वाडी वस्तीवर राहणा-या कुटूंबांनी पाळीव प्राणी, जनावरे यांच्यासह स्वसंरक्षणासाठी वस्तीभोवती जाळ्या, तारकंपाऊंड बसवण्यास सुरुवात केली आहे. तर रात्री अपरात्री जागे राहात फटाके फोडून बिबटयांस हुसकावून लावण्यासाठी वातावरण निर्मीती केली जात आहे. वन विभागाने दक्षता घेवून बिबटया आढळून आलेल्या भागात पिंजरे लावावेत अशी मागणी अनेक गावातील ग्रामस्थांमधून पुढे येत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protective nets planted by farmers for animal safety