esakal | मसापच्या "वारसा"ने वाचनाचा वारसा जपला - आमदार जगताप
sakal

बोलून बातमी शोधा

Publication of Diwali issue of Sawedi MASAP branch

सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जग हवालदिल झाले आहे. या काळातही मराठी भाषेची गोडी व समृध्दी वाढविण्यासाठी मसाप सावेडी उपनगर शाखेने शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने केलेली वारसा दिवाळी अंकाची निर्मिती महत्त्वपूर्ण आहे.

मसापच्या "वारसा"ने वाचनाचा वारसा जपला - आमदार जगताप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः हल्लीच्या स्मार्ट पिढीला सोशल मीडियात किती जरी रस असला तरी  पुस्तकाची पाने वाचतांना जो आनंद मिळतो. तो हल्लीच्या बुक मार्कच्या वातावरणात मिळणार नाहीं. ही वाचन संस्कृती जपण्याचे, त्याला समृध्द करण्याचें काम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेने केले. 

वारसा दिवाळी अंकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील लेखक, कवी यांच्या प्रतिभेला साहित्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी, उपनगर शाखा व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने वारसा दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना आमदार जगताप बोलत होते.  शहराचे महापौर श्री बाबासाहेब वाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष श्री नरेंद्र फिरोदिया होते.

या वेळी बोलताना जगताप पुढे म्हणाले की, सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जग हवालदिल झाले आहे. या काळातही मराठी भाषेची गोडी व समृध्दी वाढविण्यासाठी मसाप सावेडी उपनगर शाखेने शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने केलेली वारसा दिवाळी अंकाची निर्मिती महत्त्वपूर्ण आहे.

अंकाचा दर्जा व त्याची गुणवत्ता यामुळे गतवर्षी अंकास महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत संस्थांची पाच प्रथम क्रमांकाची  पारितोषिके मिळाली आहेत. यामुळे साहित्य क्षेत्रात जिल्ह्याच्या गौरवात भर पडली आहे. आम्हाला याचा अभिमान आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, मसापच्या सावेडी उपनगर शाखेने विविध साहित्यिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करीत  अल्पावधीत साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. विभागीय साहित्य संमेलन, हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले विद्यार्थी साहित्य संमेलनाने, मान्यवर साहित्यिकांचा पुरस्कार देऊन गौरव या उपक्रमांनी शहरात मोठा इतिहास निर्माण केला आहे.

नरेंद्र फिरोदिया यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने सावेडी उपनगर शाखेने शहराचे नाव उंचावले आहे. भविष्यात साहित्य क्षेत्रात दमदार पिढी निर्माण करण्यासाठी शाखेचे व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनचे योगदान मोलाचे असून नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, वारसा दिवाळी अंकांचे यंदाचे पाचवे वर्ष असून अंकाची सुरेख मांडणी तसेच महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांचा असलेला सहभाग व गुणवत्तेमुळे अंकाने साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

जिल्हयातील साहित्यिकांच्या प्रतिभेला वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी म.सा.प सावेडी उपनगर शाखा व शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन नेहमीच प्रयत्नशील आहे. यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कोरोना विषाणू संसर्ग असतानाही साहित्य सेवेमध्ये कोणताही खंड पडू नये. याच विचारांनी वारसा दिवाळी अंकाची निर्मिती झाली आहे. यंदाचा अंकही वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास आहे.

भविष्यात जिल्ह्यातील साहित्य चळवळ समृध्द करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील साहित्यिकांच्या प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी  विविध उपक्रम राबविण्यात येतील.
यंदाच्या वारसा दिवाळी अंकामध्ये मान्यवरांच्या साहित्यासोबत नामवंत चित्रकार श्रीधर अंभोरे यांची रेखाचित्रे, किरण गवते यांचे डिझाईन, नवोदय एन्टरप्राईजेस यांची उत्कृष्ठ छपाई, प्रशांत येमुल यांचे मुखपृष्ठ छायाचित्र यामुळे अंकाच्या गुणवत्तेत भर पडली आहे.

अंकाच्या निर्मितीमध्ये उपसंपादक प्रा. शशिकांत शिंदे, वैशाली मोहिते यांचे विशेष योगदान लाभले आहे. म.सा.प सावेडी शाखेचे प्रमुख कार्यवाह व अंकाचे कार्यकारी संपादक जयंत येलुलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. शाखेचे कार्याध्यक्ष भालचंद्र बालटे यांनी स्वागत तर पदाधिकारी सुरेश चव्हाण यांनी आभार मानले.
संपादन - अशोक निंबाळकर

loading image