esakal | विखे पाटलांनी आरोग्य अधिकाऱ्यांना खडसावले

बोलून बातमी शोधा

राधाकृष्ण विखे पाटील
विखे पाटलांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सुनावलं
sakal_logo
By
टीम ई सकाळ

संगमनेर ः "कोणाच्या सांगण्यावरून शिर्डी मतदारसंघात अधिकारी निर्णय करणार असतील, तर ते खपवून घेणार नाही... आमचे राजकारण आम्ही पाहून घेवू, तुम्ही या संकटकाळात राजकारण करू नका,' अशा शब्दांत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांना खडेबोल सुनावले.

कोविड संदर्भात तालुक्‍यातील महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आश्‍वी खुर्द येथे झालेल्या बैठकीत कोविड लसीवरुन झालेल्या राजकारणामुळे ते चांगलेच संतप्त झाले.

विखे पाटील म्हणाले,"" सध्याचे वातावरण गंभीर आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. परंतु अशा परिस्थितीत तुम्ही मनमानी करणार असाल, तर तुमच्या विरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार करावीच लागेल, तुम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही,'' या शब्दांत त्यांनी तालुका आरोग्याधिकाऱ्यांचा समाचार घेतला.

तालुक्‍यातील निमगावजाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेला कोविड प्रतिबंधक लसीचा डोस डॉ. सुरेश घोलप यांनी दबावातून जोर्वे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पाठविल्याने असंख्य सामान्य नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले होते. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तालुक्‍यातील निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण मोहीम सुरू होती. मात्र या आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवारी या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना लस न मिळाल्याने घरी परतावे लागले होते.

या संदर्भात विखे पाटील यांनी चौकशी करुन, प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. निमगावजाळी येथील लसींचे डोस डॉ. घोलप यांनी कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावामुळे जोर्वे येथील उपकेंद्रात पाठवले.

याबाबत तहसीलदार अमोल निकम यांना कोणतीच कल्पना नसल्याचे समजते. तसेच लॉकडाऊन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी पोलिस प्रशासन आणि गटविकास अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. तहसीलदारांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितले.

या घटनेबाबत डॉ. सुरेश घोलप यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे झाल्याने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घोलप वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

या बैठकीला 26 गावांमधील प्रमुख कार्यकर्ते, खासगी डॉक्‍टर, जिल्हा परिषद सदस्य ऍड. रोहिणी निघुते, रामभाऊ भुसाळ, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लस तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी परस्पर दुसरीकडे पाठवल्याने अनेक ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागले. या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 18 गावांमधून नागरिक सकाळपासून लसीकरणासाठी येतात याचा विचार आरोग्य विभागाने करणे गरजेचे होते.

अमोल जोंधळे, सरपंच, निमगावजाळी

जोर्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाही कळवले नाही. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गलिच्छ राजकारण करून ठराविक कुटुंबियांना लस दिली. यामुळे जोर्वे आणि पंचक्रोशीत सामान्य नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले. - गोकुळ दिघे, उपसरपंच, जोर्वे

बातमीदार - आनंद गायकवाड