Ahmednagar : लोहसरला छत्रपती वनश्री पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : लोहसरला छत्रपती वनश्री पुरस्कार

करंजी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने वनक्षेत्रातील वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लोहसर (ता. पाथर्डी) या गावाला राज्यस्तरीय श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. लोहसर गावाला नाशिक विभागामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे, तर राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी फटाके उडवून व गावात पेढे वाटून आनंद साजरा केला. हा पुरस्कार सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने मिळाला असल्याचे सरपंच हिराबाई गिते व अनिल गिते यांनी सांगितले.

लोहसर ग्रामपंचायतीला राज्याच्या वतीने ५० हजार रुपयांचे, तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल पन्नास हजार रुपये पारितोषिक मिळणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून लोहसर ग्रामपंचायत, तसेच पवळवाडी हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून वनसंवर्धन केले जात आहे.

गावामध्ये जनजागृती, कुऱ्हाडबंदी आदी उपक्रम राबवले आहेत. लोहसर ग्रामपंचायतीअंतर्गत, तसेच वन विभागामध्ये सुमारे एक लाख वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना केली आहे. बिहार पॅटर्नअंतर्गत लोहसर गावामध्ये येणाऱ्या चोहोबाजूंच्या रस्त्यांवर सुमारे पाच किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी आठ हजार वृक्षांची लागवड केली आहे. गावातील भैरवनाथ मंदिरासमोर व परिसरामध्ये स्मृती वृक्षलागवड योजना राबवून ५०० वृक्षांची लागवड केली आहे.गावामध्ये आणखी विकासात्मक कामे करणार असल्याचे सरपंच हिराताई गिते यांनी सांगितले.