माजी आमदार राहुल जगतापही उतरले जिल्हा बँकेच्या निवडणूक आखाड्यात, श्रीगोंद्यात होणार घमासान

संजय आ. काटे
Monday, 4 January 2021

सेवा संस्था मतदारसघांतून ही निवडणूक लढणार असल्याचे सांगत जगताप म्हणाले, ""समविचारी नेते, कार्यकर्त्यांशी चर्चा झाली असून, निवडणुकीची सर्व तयारीही केली आहे.

श्रीगोंदे : जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंक ही शेतकऱ्यांचा आत्मा आहे. सहकारी सेवा संस्था व सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या या बॅंकेत श्रीगोंद्याचा विचार करता, काही अपप्रवृत्तींचा प्रवेश झाला आहे.

अशा लोकांनी या बॅंकेचा कारभार खासगी मालकी असल्यासारखा केल्याने, तालुक्‍यातील सहकाराला लागलेले ग्रहण हटविण्यासाठी उमेदवारी करावी, अशी अनेकांची अपेक्षा आहे. त्यामुळे आपण बॅंक निवडणूक लढणार असल्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी सांगितले. 

"सकाळ'शी बोलताना जगताप यांनी जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ""तालुक्‍यात ज्या नेत्यांनी सहकार रूजवून तो वाढविताना सामान्यांना खरा आधार दिला, असे दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप यांच्या विचारांवर आपण कुकडी कारखाना चालवित आहोत. तालुक्‍यातील अनेक सेवा संस्थांमध्ये याच विचाराचे लोक असून, तेथील कारभार शेतकरीहिताचा होत आहे.'' 

हेही वाचा -  पुणे-नाशिक रस्त्यावर फुलले ताटवे

सेवा संस्था मतदारसघांतून ही निवडणूक लढणार असल्याचे सांगत जगताप म्हणाले, ""समविचारी नेते, कार्यकर्त्यांशी चर्चा झाली असून, निवडणुकीची सर्व तयारीही केली आहे. वडील कुंडलिकराव जगताप व शिवाजीराव नागवडे यांनी बॅंकेच्या माध्यमातून पारदर्शी व लोकहिताचा कारभार केला. पूर्वीच्या अनेक संचालकांनी तालुक्‍यातील लोकांना सहकाराच्या माध्यमातून मदत केली. मात्र, त्याची कुठेही वाच्यता केली नाही. हीच पद्घत आपणही कारखान्याच्या माध्यमातून सहकारात अंगीकारली.'' 

पूर्ण ताकदीनिशी उतरणार 
""काही लोकांनी खासगी संस्था असल्यासारखी जिल्हा सहकारी बॅंक चालविली. त्यामुळे बॅंक अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शेतकऱ्यांना बॅंकेचे कर्ज वाटताना ते स्वत:च्या खिशातून वाटल्याचा अविर्भाव करणाऱ्यांना आता घरी बसवा, असे अनेकांचे निरोप आले. त्यामुळे सहकाऱ्यांशी चर्चा करून या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी केली आहे,'' असे जगताप म्हणाले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Jagtap will contest District Bank elections