
जप्त मुद्देमालाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. भेसळयुक्त ५३२ लिटर दूध जागेवर ओतून नष्ट करण्यात आले. दूध केंद्राचा परवाना त्वरित निलंबित करून, पथकाने दूध केंद्र सील केले.
राहुरी : चंडकापूर (ता. राहुरी) येथे जय भवानी दूध संकलन केंद्रावर नगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. भेसळयुक्त दूध व दूध भेसळीच्या रसायनांचा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भेसळयुक्त दुधाचे व रसायनांचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन, ५३२ लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. दूध केंद्र सील करून, दूध केंद्राचा परवाना त्वरित निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली.
आज (गुरुवारी) सकाळी नऊ वाजता चंडकापूर येथे नगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुटे, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांच्या पथकाने छापा टाकून, कारवाईचा बडगा उगारला.
राजेंद्र चांगदेव जरे यांच्या जय भवानी दूध संकलन केंद्राच्या ठिकाणी व राहत्या घरामध्ये दूध भेसळीसाठी साठवलेली २५ किलो व्हे पावडर, १५२ किलो लिक्विड पॅराफीन, ५३२ लिटर भेसळयुक्त दूध असा तीस हजार २४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त मुद्देमालाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. भेसळयुक्त ५३२ लिटर दूध जागेवर ओतून नष्ट करण्यात आले. दूध केंद्राचा परवाना त्वरित निलंबित करून, पथकाने दूध केंद्र सील केले.
'सकाळ' शी बोलतांना सहाय्यक आयुक्त शिंदे म्हणाले, "राजेंद्र जरे हा दररोज ८०० लिटर दूध शेतकऱ्यांकडून संकलित करायचा. त्यामध्ये कृत्रिम तयार केलेले २०० लिटर दूध मिश्रण करून, दररोज एक हजार लिटर भेसळयुक्त दूध पुढे विक्री करायचा. अशी गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या नगर कार्यालयाला मिळाली. त्यानुसार, जरे यांच्या जय भवानी दूध संकलन केंद्रावर छापा टाकून कारवाई केली."
अहमदनगर